जलपर्णी अडकली गाळात
By Admin | Published: June 26, 2017 01:28 AM2017-06-26T01:28:16+5:302017-06-26T01:28:16+5:30
कामवारी नदीतील जलपर्णी गाळात रूतली आहे. या वनस्पतींना पुढे मार्ग न मिळाल्यास परिसरात पाणी साचण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कामवारी नदीतील जलपर्णी गाळात रूतली आहे. या वनस्पतींना पुढे मार्ग न मिळाल्यास परिसरात पाणी साचण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
कामवारी नदीतील गाळ काढण्याकडे महसूल विभाग, लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचा पाटबंधारे विभाग व पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. तीन महिन्यांपासून ही नदी कोरडी होती.यामुळे विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्तींचे अवशेषही बाहेर आले होते. तर काही ठिकाणी नदीतील साचलेल्या पाण्यात जलपर्णी पसरल्या होत्या. नदीवर बांधलेल्या धरणाच्या पलिकडेही साचलेल्या पाण्यात जलपर्णी होत्या. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नदीतील प्रवाह वाढून या सर्व जलपर्णी भिवंडी-वाडा मार्गावरील पुलाखाली अडकल्या. पुलाच्या पलिकडे म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सुकलेल्या नदीपात्रात कचरा टाकल्याने या जलपर्णीस पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने ते एकाच जागी साचलेल्या आहेत. तालुक्यातील दहापेक्षा जास्त गावांमधील पाणी नदीतून वाहते.
कामवारी नदीच्या एका बाजूला शेलार गाव असून दुसऱ्या बाजूला रहिवाशांनी बांधकाम करून नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे.त् यामुळे नदीचा प्रवाह वेगवान होऊन जलपर्णीव्दारे ते पाणी अडले तर ते पाणी शेलार भागात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या खाडीला रविवारी पहाटेच्यावेळेस भरती आल्याने मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या काही भागातील पाण्याचा निचरा झाला नाही. परंतु पुन्हा भरती आणि मुसळधार पाऊस झाला तर पूरपरिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.