उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष
By पंकज पाटील | Published: May 17, 2023 04:35 PM2023-05-17T16:35:20+5:302023-05-17T16:35:33+5:30
संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे.
बदलापूर: बदलापुरात उल्हास नदी पूर्णपणे प्रदूषित झाले असून आता या नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला आहे. महिन्याभरापूर्वी काही प्रमाणातच ही जलपर्णी नदीत होती. मात्र आता जलपर्णीने संपूर्ण उल्हास नदी ताब्यात घेतली आहे. जलपर्णीच्या या वाढता विस्तारामुळे नदीच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. बदलापुरातील सर्व नाले थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णीचा विस्तार देखील वाढला आहे. जलपर्णीवर योग्य उपाययोजना केले जात नसल्याने आता संपूर्ण उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. वालीवली गावाजवळील नदीवर जलपर्णीची हिरवी शाळ पांघरली गेली आहे. या जलपर्णीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
जलपदीचा विस्तार उल्हास नदीत केवळ बदलापूर शहरापूर्ती नसून हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागात देखील निर्माण झाली आहे. आपटी, रायता नदीपात्रात देखील जलपर्णीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हीच परिस्थिती रायता पूल ते शहाड पर्यंत निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने औषध फवारणी करून ही जलपर्णी नष्ट केली होती मात्र यंदाच्या वर्षी अशा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे.