ठाण्यात १०० कोटींचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट
By admin | Published: June 19, 2017 03:40 AM2017-06-19T03:40:36+5:302017-06-19T03:40:36+5:30
ठाणे महापालिकेने पारसीक चौपाटीचा विकास करण्यासाठी पावले उचल्यानंतर आता पुढील टप्प्यात वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्प राबविण्यासाठी जोरदार हालचाली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने पारसीक चौपाटीचा विकास करण्यासाठी पावले उचल्यानंतर आता पुढील टप्प्यात वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्प राबविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. साकेत - बाळकूम, कोलशेत आणि नागला बंदर खाडीलगत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव २० जून रोजीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
खाडी किनारा विकसित करण्याचा म्हणजेच वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्पाचा एक भाग म्हणून साकेत - बाळकूम खाडी येथील १ किमी लांबीपर्यंत चौपाटी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या ठिकाणी विसर्जन घाट, सुमारे ३ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड वॉकवे, अॅम्पी थिएटर, जॉगींग ट्रॅक, खेळाचे मैदान, नाना नानी पार्क, चिल्ड्रन प्ले एरिया, बैठक व्यवस्था, उद्याने, ओपन जीम, फुड कोर्ट, प्रसाधन गृह, वाहनतळ, कुंपण भिंत, मनोरंजनात्मक सुविधा, विद्युत संबधींत कामे आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, या आर्थिक वर्षात ७ कोटी एवढा खर्च करण्यात येऊन १८ कोटी २०१८-१९ या आर्थिक वर्षात खर्च करण्यात येणार आहे.
तसेच, कोलशेत येथेदेखील अशाच पद्धतीने सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यानुसार यासाठीही २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नागलाबंदर येथील खाडीकिनारादेखील विकसित करण्याचे प्रयोजन आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित धरला असून या आर्थिक वर्षात १३ कोटी ५० लाख आणि उर्वरित ३६ कोटी ५० लाखांचा खर्च पुढील आर्थिक वर्षात केला जाणार आहे.