वॉटरफ्रंट प्रकल्पांना घरघर; कामे कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:39 AM2020-10-10T01:39:00+5:302020-10-10T01:39:03+5:30
प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचा ठाणे पालिकेचा दावा
ठाणे : ठाणे महापालिकेकडून शहरातील खाडीकिनारे विकसित करण्यात येत आहेत. त्यानुसार, चार ठिकाणी खाडीकिनारे अर्थात वॉटरफं्रट डेव्हलपमेंटचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामांवर वेळोवेळी अनेक आक्षेप घेण्यात आले असले, तरीही कामे सुरू असल्याचा दावा पालिकेने केला आहे. प्रत्यक्षात या चारही प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. काही कामांना तर निधीही मिळेनासा झाला आहे.
ठाणे महापालिकेने खाडीकिनारे विकसित करण्यासाठी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत खाड्यांचा विकास करताना येथे बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, खाडीकिनाऱ्यावर मँग्रोव्हज टेल्स, प्रॉमिनेड्स, जॉगिंग ट्रॅक्स, सायकल ट्रॅक्स, पब्लिक प्लेसेस, मिनी पिकनिक सेंटर आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत ठाणे शहर, खारेगाव, साकेत, बाळकुम, कोलशेत, गायमुख, मोगरपाडा, कासारवडवली, कावेसर, रेतीबंदर, पारसिक चौपाटी, मुंब्रा आणि दिवा आदी खाडीकिनाऱ्यांचा विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे कॉलेज ते साकेतदरम्यानचा विकास निश्चित केला आहे. त्यानुसार, महापालिकेने खाडीकिनारा विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला होता. चार ठिकाणच्या या कामांसाठी साधारणपणे २२४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. मागील वर्षी ठाणे पूर्व येथील खाडीकिनारी वॉटरफ्रंटच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. कोलशेत नागलाबंदर, कावेसर-वाघबीळ येथील प्रकल्पासाठी हरकती न मागवताच ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली.
कावेसर, वाघबीळ येथील काम ५.५० टक्के झाले असतानाही ठेकेदाराला एक कोटी ६० लाख दिल्याचा आरोपही झाला आहे. अशा स्थितीतही या प्रकल्पांचे काम सुरूच असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
किती टक्के झाली कामे?
पारसिक रेतीबंदर येथील चौपाटीचे अवघे २८ टक्के काम पूर्ण झाले असून २३ टक्के निधी खर्च झाला आहे. नागलाबंदर पाच टक्के काम पूर्ण झाले असून निधी अद्याप वर्ग झालेला नाही.
कोलशेत, कावेसर-वाघबीळ येथील पाच टक्के काम झाले असून ३.२ टक्के निधी खर्च झाला आहे. साकेत, बाळकुम, कळवा, कोपरी येथील ३५ टक्के काम झाले असून २७.३ टक्के निधी खर्च केल्याचा दावा पालिकेने केला आहे.
वॉटरफं्रटचा टप्पा
कोपरी ते शास्त्रीनगर- २५० मीटर
कोलशेत- १ किमी, नागलाबंदर १.४० किमी, कावेसर- ३.७० किमी अशा चार टप्प्यांत काम केले जाणार आहे.