जलवाहिन्या काँक्रिट रस्त्याखाली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 12:20 AM2019-12-08T00:20:30+5:302019-12-08T00:21:33+5:30
अधिकाऱ्यांना काम उरकण्याची घाई
बदलापूर : कल्याण-बदलापूर रस्ता आणि त्याचे बांधकाम हे पुन्हा चर्चेत आले आहे. वर्षभर रस्त्याचे काम रखडवून ठेवणाºया एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आता घाईघाईत रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणात ज्या जलवाहिन्या आणि विद्युतवाहिन्या अडथळा निर्माण करत होते. त्यातील जलवाहिन्या स्थलांतरित न करताच थेट त्यावरच काँक्रिट रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहतूक सुरू झाल्यावर काँक्रिटखाली असलेली वाहिनी फुटण्याची भीती आहे. तसेच या वाहिनीच्या दुरुस्तीसाठी काँक्रिट रस्ता फोडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करताना जलवाहिन्या स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.
कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम हे अंबरनाथ शहरात सुरू आहे. रुंदीकरणादरम्रूान रस्त्या खाली असलेल्या विद्युतवाहिनी, जलवाहिनी आणि मोबाइल कंपन्यांच्या वायरी स्थलांतरित करणे गरजेचे आहे. हे स्थलांतरित करण्याचा स्वतंत्र आराखडाही तयार केला आहे. त्या आराखड्याच्या मंजुरीची प्रतीक्षा न करतातच आहे, त्याच जागेवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे.
त्यातील विम्को नाका ते बुवापाडा भागापर्यंत मुख्य जलवाहिनी ही पूर्णपणे काँक्रिट रस्त्याखाली जात आहे. रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. एक फुटावरच जलवाहिनी येत असतानाही त्या वाहिनीचे स्थलांतर न करता थेट आहे, त्यावर काँक्रिट भरण्याचे काम सुरू केले आहे. मुळात या वाहिन्या स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार असताना एमएमआरडीएचे अधिकारी रस्त्याचे काम उरकण्याच्या हेतूने थेट त्या रस्त्याचे काम सुरू केले आहे.
ज्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी रस्त्याचे काम विलंबाने करण्यात आले, त्याच रस्त्याचे काम करताना आता जलवाहिनी स्थलांतरित न करताच या रस्त्याचे काम उरकण्याची घाई सुरू झाली आहे. विम्को नाका परिसरात जलवाहिनी ही अवघ्या एका फुटावर असल्याने काँक्रिटचा थर या वाहिनीवर पडणार आहे. त्यामुळे वाहिनी फुटल्यास काँक्रिट रस्ता खोदावा लागेल.
दोन ते तीन फुटांची भरणी
जलवाहिनीचा त्रास हा फॉरेस्ट नाका परिसरातही आहे. त्या ठिकाणी उताराचा रस्ता असल्याने त्याठिकाणी दोन ते तीन फुटांची भरणी टाकून या वाहिन्यांखाली दाबण्यात आले आहे. उल्हासनगर महापलिका, मोहन नॅनो सीटी आणि जीवन प्राधिकरण आणि आयुध निर्माणी कारखान्याची मुख्य जलवाहिनी याच फॉरेस्टनाक्याच्या रस्त्यावरून गेली आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या अति घाईमुळे सर्व वाहिन्या या काँक्रिट रस्त्याखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीए आणि ठेकेदारांनी हे काम करताना जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.