वाकण-खोपोली रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:13 AM2017-08-04T02:13:31+5:302017-08-04T02:13:31+5:30
वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे
पाली : वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ओव्हरलोड व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून ओव्हरलोड वाहतूक करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत
आहे.
या मार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या खड्डेमय मार्गावरून दररोज प्रवास करणाºया दुचाकीस्वारांना कंबरेचे व मणक्याचे आजार होत आहेत. मात्र या सर्व गंभीर बाबींकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरती पाली व जांभूळपाडा येथे ब्रिटिशकालीन दोन पूल आहेत.
या पुलांची भारवहनक्षमता फक्त १९ टन इतकीच असून आजघडीला येथून ५० ते ६० टन भारवहनक्षमतेच्या वाहनांची अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे या पुलाला धोका असून पुन्हा एकदा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना याच मार्गावरील नेरळ साईमंदिर परिसरातही रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच रस्ताही खचला आहे, परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
नेरळ-कळंब या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते, या रस्त्यावरील साईमंदिर परिसरात मागील वर्षी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी नाल्या काढण्यात आल्या होत्या, परंतु यावर्षी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
याच रस्त्यावर पुढे काही भाग खचला आहे. त्याठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे. परंतु येथून भरधाव वेगाने जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा न दिसल्यास रात्रीच्या वेळी येथे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा खचलेला रस्ता चांगल्या दर्जाचा कधी करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडला आहे.
या वाहतुकीमुळे अपघातात वाढ
सुप्रीम, जिंदाल, जेएसडब्लू या कंपनीच्या मालाची अवजड वाहतूक व वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक या मार्गावरून राजरोसपणे होत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक करताना त्या वाहनामधील माल रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.