लाटांनी घेतला बोटीचा बळी, सातपाटीजवळ समुद्रातील थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:44 AM2020-08-06T01:44:21+5:302020-08-06T01:45:01+5:30
सातपाटीजवळ समुद्रातील थरार : १५ खलाशांचे प्राण वाचले
हितेन नाईक
पालघर : समुद्रातील वादळीवाऱ्याचा फटका बसून सातपाटीच्या किनाºयावर येणारी ‘प्राजक्ता’ ही मासेमारी नौका दगडी बंधाºयावर अडकून पडल्याने तिला वाचवण्याचे स्थानिक मच्छीमारांचे प्रयत्न फोल ठरले. दुपारी दुसऱ्यांदा केलेल्या प्रयत्नात लाटांच्या फटकाºयाने या नौकेचे तुकडेतुकडे झाले. बोटीत असलेले लाखो रुपयांचे साहित्यही नष्ट झाले आहे. मात्र, नौकेतील १५ मच्छीमारांनी समुद्रात उड्या घेऊ न आपले प्राण वाचवले. या दुर्घटनेमुळे चौधरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे.
सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सभासद असलेले मोरेश्वर चौधरी यांच्या मालकीची ‘प्राजक्ता’ ही नौका २ आॅगस्टला मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली होती. ३ आॅगस्टपासून वादळीवाºयामुळे मासेमारी न करताच ४ आॅगस्टला ही बोट परतत होती. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही नौका सातपाटीच्या समुद्रात पोहोचली. मुसळधार पावसामुळे नौकानयनमार्गच दिसेनासा झाला होता. त्यामुळे तांडेल जितेश चौधरी यांनी आपल्या नौकेची लोखंडी लोयली (अँकर) समुद्रात टाकून एका जागी स्थिर राहण्याचे ठरवले. मात्र, वादळाचा वेग वाढल्याने ही नौका फरफटत किनाºयावरील दगडी बंधाºयाजवळ पोहोचल्याचे नौकेतील मच्छीमारांना कळलेच नाही. ही नौका बंधाºयावर आपटू लागल्याने मोबाइलवरून स्थानिक मच्छीमारांना संपर्क केल्यावर अनिल चौधरी, सनी चौधरी, मुकेश मेहेर, अभी मेहेर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, लाटांपुढे त्यांचे काही चालले नाही.
चौधरी कुटुंबीयांवर संकट : शासनाच्या एनसीडीसी योजनेंतर्गत १० ते १२ लाख कर्ज आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहकारी संस्थांद्वारे घेतलेल्या पाच लाखांच्या कर्जातून उभारलेली नौका पूर्ण उद्ध्वस्त झाल्याने चौधरी कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अर्थार्जनाचे साधनच दर्याराजाने हिरावून घेतल्याने आता खायचे काय, असा सवाल चौधरी कुटुंबातील महिला करत आहेत.