ठाण्यातील तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:37 PM2019-06-09T23:37:37+5:302019-06-09T23:39:47+5:30
ठाणे शहरात आजच्याघडीला ३४ तलाव शिल्लक राहिले आहेत
ठाणे शहर हे पूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. त्यानुसार शहरात ६५ तलाव अस्तित्वात होते. परंतु आजच्याघडीला ३४ तलाव शिल्लक असून त्यातील अवघ्या पाच ते सहा तलावांवर वारंवार कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु इतर तलावांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची बाब आजही प्रकर्षाने जाणवते. आज शहरातील इतर काही तलावांकडे लक्ष देण्यास त्याची साफसफाई, पाण्याची गुणवत्ता वाढविण्याकडे पालिकेने सुरूवात केली आहे. परंतु आजही शहरात असे काही तलाव आहेत, जे हळूहळू नामषेश होण्याच्या मार्गावर आले आहेत. काही तलावांना झोपडपट्टीचा विळखा पडला आहे. तर काही तलावांचे संवर्धन केवळ त्याठिकाणी नव्याने येणाऱ्या विकासकांच्या हितासाठी केले जात असल्याचे दिसते. परंतु जे तलाव गायब झाले आहेत, याची कोणतीही माहिती पालिकेकडे आजच्या घडीला उपलब्ध नाही.
ठाणे शहरात आजच्याघडीला ३४ तलाव शिल्लक राहिले आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच तलावांची अवस्था चांगली आहे. परंतु जे जवळपास ४० हेक्टरचा परिसर तलावांनी व्यापला आहे. शहरातील अनेक तलाव हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून या तलावांना अतिक्र मण मुक्त करण्यासाठी पालिकेचे प्रयत्नही सुरु आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त यांनी स्वत: तलावांच्या संवर्धनासाठी पावले उचलली असून उथळसर भागातील अतिक्रमण झालेल्या तलावाला नवसंजवीनी देण्याचे काम हाती घेतले आहेत. तर दुसरीकडे तलावांमध्ये काही प्रमाणात प्रदूषण निर्माण झाल्याने तलावातील पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तलावांच्या प्रदूषणाबाबत पर्यावरण तज्ज्ञांच्या वतीनेही अनेकवेळा मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालामधून मात्र तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तलावांच्या पाण्यामधील महत्वाचा घटक असलेल्या बायोलॉजिकल आॅक्सिजनची पातळी तपासण्यात आली. अशा प्रकारची २४ तलांवाच्या पाण्याची तपासणी करण्यात आल्यानंतर १८ तलावांमध्ये बीओडीची पातळी चांगली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तलावांमध्ये असलेल्या जैवविविधतेची ही चांगली गोष्ट असल्याचे प्रदूषण विभागाचे म्हणणे आहे. पाण्याची गुणवत्ता वाढलेल्या तलावांमध्ये फडकेपाडा तलाव, खारेगांव, मासुंदा, ब्रह्माळा, जेल तलाव, उपवन तलाव आणि शिवाजी नगर तलावाचा समावेश आहे. पाण्याची गुणवत्ता वाढण्यामध्ये या तलावांमध्ये नियमतिपणे करण्यात येणारी एरिएशन आणि प्रिबायोमेट्रिक प्रक्रिया हे प्रमुख कारण आहे. सिव्हरेजचे पाणी तलावांमध्ये जाऊ नये याचीही विशेष दक्षता घेतली गेली असल्याने ही सुधारणा झाली असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. पूर्वी ठाणे शहरात ६५ तलाव होते, परंतु आजच्याघडीला शहरात केवळ ३४ तलाव शिल्लक राहिले आहेत. यातील ब्रह्माळा, उपवन, कचराळी, मासुंदा आणि आंबेघोसाळे याच तलावांवरच पालिका दरवर्षी लाखोंची उधळपट्टी करत आहेत. परंतु ही नैसर्गिक संपत्ती जोपसण्यासाठी महापालिकेकडे फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. ६५ तलाव ही ठाण्याची ओळख होती, परंतु त्यातील ३० तलावांचे काय झाले असा सवाल आता ठाणेकर उपस्थित करू लागले आहेत. जे जुने जाणकार ठाणेकर आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार आज त्या तलावांच्या ठिकाणी झोपडपट्टींचा विळखा बसला असून, काही ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या आहेत. एक तलाव तर महापालिकेने गिळंकृत केला आहे.
‘त्या’ तलावांची यादीच नाही
या संदर्भात प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नामशेष झालेल्या तलावांची माहिती मागितली असता, ती उपलब्ध नसल्याचे सांगून ही माहिती स्थावर मालमत्ता विभागाकडे मिळेल असे सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात स्थावर मालमत्ता विभागाकडे विचारणा केली असता, ही माहिती प्रदूषण नियंत्रण विभागाकडे असायला हवी असे उत्तर देण्यात आले. माहिती जुनी असल्याने ती आता सापडणेही आता कठीण असल्याचे या विभागातील एका बड्या अधिकाºयाने सांगितले. त्यात आज घोडबंदर भागात ओवळा या गावात तीन तलाव असून या गावाच्या हद्दीत प्रवेश केल्यावर एक छोटा तलाव दिसतो. पूर्वी हा तलाव मोठा होता, असे येथील नागरिक सांगतात. परंतु आज या तलावाच्या चारही बाजूंनी बांधकामे उभी राहिली असून तलावाचे आकारमान कमी झाले आहे. हळूहळू तलावात भराव घालून नामषेश करण्याचा घाटही घातला जात असल्याचा आरोप काही जाणकार करत आहेत. पुढे मोघरपाडा तलाव असून या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या तलावाचे आकरमान यामुळे कमी झाले आहे. त्यामुळे या तलावाचा जीव गुदमरु लागला असल्याचे दिसत आहे. त्यात पुढे गेल्यावर कासारवडवली तलाव असून हा तलावही अतिशय पुरातन मानला जात आहे. तीनच दिवसापूर्वी दक्ष ठाणेकरांनी या तलावातून ४ टन कचरा काढला होता. परंतु आजच्याघडीला पुन्हा या तलावात कचरा असल्याचे दिसून आले आहे. तर कावेसर भागात असलेल्या तुर्फेपाडा तलावातील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली असून या तलावाचेसुध्दा सुशोभीकरणाचे काम सुरु असून तलावाचा आकार कमी होत आहे. तर ठाण्यातील सिध्देश्वर तलावालाही झोपडपट्टींचा विळखा पडला आहे. तर शहरातील मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु असून त्यामुळे तलावाचा आकार कमी होत आहे. तर उपवन, कचराळी तलावाला फेरीवाले आणि प्रेमीयुगलांचा सतत गराडा असल्याचे दिसते. नियोजना अभावी आणि त्यांनी केलेल्या दुर्लक्षतेमुळेच तलाव नामशेष झालेले आहेत. किंबहुना हे तलाव बुजविण्यामागे राजकीय वरदहस्तही जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
ठाणे, कल्याण ही शहरे एकेकाळी तलावांची शहरे म्हणून ओळखली जायची. पण आज या दोन्ही शहरातील तलावांच्या बाजूला अतिक्रमण झाल्याने दुरवस्था झाली आहे. पालिका या अतिक्रमणांवर कारवाई करत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरमधील तलावांची आज नेमकी काय स्थिती आहे, याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजित मांडके, प्रशांत माने आणि धीरज परब यांनी घेतला.
कल्याण-डोंबिवलीमधील तलावांची झाली डबकी
कल्याण शहराच्या इतिहासात तलावांना अनन्य साधारण महत्त्व होते. तलावांचे शहर म्हणून ठाणे पाठोपाठ कल्याणचा लौकिक होता. पण काळा तलाव आणि टिटवाळा महागणपती मंदिर तलावांचा अपवाद वगळता अन्य तलावांची दुरवस्था झाली आहे. अहवाल, समित्या स्थापन करणे, आर्थिक तरतुदी आणि पाहणी दौरे या व्यतिरिक्त केडीएमसीकडून फारसे काम न झाल्याने बहुतांश तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आता तलाव म्हणजे शहरातील डम्पिंग ग्राऊंड ठरू लागली आहेत. यात कल्याणसह डोंबिवलीतील काही तलाव प्रदूषित झाले असून बांधकामधारकांकडून तलाव गिळंकृत करण्याचे सुरू असलेले प्रकार पाहता एकप्रकारे तलावांच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला आहे. कल्याण शहरातील ऐतिहासिक काळा तलाव आणि टिटवाळामधील गणपती मंदिर तलाव वगळता इतर तलावांची अवस्था पाहता याची प्रचिती येते. काळा तलाव असो अथवा गणपती मंदिर तलाव हे शहराचे वैभव असलेल्या परिसरात फेरफटका मारणे एक वेगळाचा अनुभव देऊन जाते. मात्र अन्य तलावांच्या बाबतीत मात्र प्लास्टिक पिशव्या, कचरा, पूजेचे साहित्य टाकण्याचे एकमात्र ठिकाण म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत सध्या ४२ तलाव आहेत. पूर्वी ही संख्या ३० च्या आसपास होती. परंतु २७ गावांचा समावेश झाल्याने या तलावांच्या संख्येत वाढ झाली आहे. या तलावांचा आढावा घेता महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार कल्याणमधील अ प्रभागात आठ, ब प्रभागात चार, क प्रभागामध्ये सहा, ड प्रभागातील शहरी भागात चार तर ग्रामीण भागामध्ये चार, डोंबिवली ग्रामीण भागातील ई प्रभागात सर्वाधिक ११ , फ प्रभागात दोन, ग मध्ये २ तर ह प्रभागात १ तलाव आहे. या तलावांचे पुनरु ज्जीवन करण्याचा प्रयत्न करण्याची गरज यापूर्वीही वारंवार व्यक्त झाली आहे. केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था यामध्ये आजच्याघडीला बहुतांश तलाव दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहेत. विशेष बाब म्हणजे क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या पारनाक्यावरील ऐतिहासिक काळातील पोखरण तलावाच्या सुशोभीकरणाकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. श्रेयवादात याचा विकास रखडल्याचे बोलले जाते. महापालिकेच्या अर्थसंकल्पात डोंबिवली एमआयडीसीमधील मिलापनगर तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. या तलावाचे सुशोभीकरण करून आबालवृध्दांना तिथे करमणुकीचे ठिकाण उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषण करण्यात आली आहे. मात्र आजमितीला यासंदर्भातील कोणतीही कार्यवाही पुढे सरकलेली नाही.
विशेष बाब म्हणजे केडीएमसी दरवर्षी पर्यावरण अहवाल सादर क रते. २०१८-१९ चा अहवाल अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही. २०१७-१८ च्या अहवालात तलावांच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यापूर्वीच्या अहवालातही नोंदवलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष झाल्याने एकंदरीतच हे अहवाल केवळ औपचारिकता म्हणून जाहीर केले जातात का? असाही सवाल वास्तव पाहता