रास्ता, पानी नहीं, कैसे जिऐंगे ?
By admin | Published: May 6, 2017 05:46 AM2017-05-06T05:46:53+5:302017-05-06T05:46:53+5:30
कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती
रोहिदास पाटील/लोकमत न्यूज नेटवर्क
अनगाव : कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना शहरातील शांतीनगरात घडल्याने मुस्लिम महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. सहा महिन्यांतच रस्ते खराब होत असतील, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्नही या महिलांनी विचारला आहे.
शहरातील गैबीनगर, शांतीनगर, कोंबडपाडा हाबहुतांश मुस्लिमबहुल परिसर म्हणजे समस्यांचे आगार झाले आहे. भिवंडीत पाण्याची समस्या गंभीर आहे. अण्णा भाऊ साठेनगरात १५ दिवसांनी पाणी येते. वितरणामधील दोषामुळे योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. पाइपलाइनच्या ठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे त्यातसांडपाणी शिरत असल्याने आमच्या नशिबी हे दूषित पाणी वापरण्याशिवाय गत्यंतर नाही, असे या महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियानासाठी आवाहन करत असताना शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. नाकांवर रूमाल ठेवल्याशिवाय चालताच येत नाही, असे या महिला म्हणाल्या. स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे नुसते घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे या महिलांनी आवर्जून सांगितले. पालिकेने नालेसफाईला सुरुवात केलेली नाही.
शहरात १५ आरोग्य केंदे्र आहेत. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी राहतही नाहीत. परिणामी, रात्रीअपरात्री रुग्णाला आणले तर योग्य सुविधा मिळत नाहीत. याविषयी अनेक तक्रारी करूनही आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.
ट्रिपल तलाक पद्धत बंद व्हायला हवी
ट्रिपल तलाकमहिलांच्यादृष्टीने अन्यायकारक आहे. एखादा पुरु ष आपल्या पहिल्या पत्नीशी तलाक घेतो आणि संसारात विघ्न आणतो. तो दुसऱ्या स्त्रीसोबत सुखाने संसार करणार नाही. त्यामुळे तोंडी तलाक प्रथा बंद करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या प्रवीण फारूक कणूल यांनी व्यक्त केले.
स्थानिक समस्येवरही त्यांनी जोरदार टीकास्त्र केले. रस्त्यात वाहन अडकल्यामुळे महिलेला रु ग्णालयात वेळेवर पोहोचता आले नाही. शांतीनगरमध्ये महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. यासारखा दुसरा दुर्दैवी प्रकार असूच शकत नाही. प्रशासन आणि नगरसेवक याकडे लक्ष देणार कधी, असे त्यांनी विचारले.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. पाणी, आरोग्य, गटारांचा प्रश्न सुटलेला नाही. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
- नरसीन खान, पिराणीपाडा
रस्ते, पाणी, स्वच्छता हे प्रश्न गंभीर आहेत. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागतो. नगरसेवक, पालिकेने याकडे लक्ष देत त्या सोडवणे आवश्यक आहे.
- वाजेदा तबस्सुम मोमीन, शांतीनगर
पालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, ती आपली जबाबदारी नाही, अशा पद्धतीने वागत आहेत, हे चुकीचे आहे. नागरी सुविधांसाठी नागरिकांनीच आवाज उठवायला हवा. - जोहरांनी मोईद्दीन शेख,
कोंबडपाडा