रुग्णालय उभारण्याचा मार्ग झाला मोकळा, शासनाने परत घेतलेला कोहोजगाव येथील भूखंड पुन्हा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:20 AM2020-10-27T01:20:09+5:302020-10-27T01:21:08+5:30
Ambernath News : हे प्रकरण काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात उघड केल्यानंतर प्रशासन हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी झटत होते. त्यातच याप्रकरणी पालिकेने पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड पुन्हा पालिकेच्या ताब्यात दिला आहे.
- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात रुग्णालयासाठी आरक्षित असलेला भूखंड राज्य शासनाने गतवर्षी ताब्यात घेतला. पालिकेकडे देण्यात आलेला भूखंड विकसित न केल्याने शासनाने तो भूखंड स्वत:च्या ताब्यात घेतला होता. हे प्रकरण काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात उघड केल्यानंतर प्रशासन हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी झटत होते. त्यातच याप्रकरणी पालिकेने पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड पुन्हा पालिकेच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे या भूखंडावर रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोहोजगाव येथील रुग्णालयासाठी आरक्षित असलेला भूखंड अटी आणि शर्ती न पाळल्याने शासनाने पुन्हा ताब्यात घेतला होता. पालिकेकडून हा भूखंड शासनजमा होत असल्याचा निर्णय १८ जुलै २०१९ रोजी घेण्यात आला. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आणि गटनेते प्रदीप पाटील यांनी या भूखंडावरून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली. त्यानंतर, अधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे भूखंड पुन्हा ताब्यात मिळावा, यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण उपविभागीय अधिकारी जगतसिंह गिरासे यांच्याकडे निकाली काढण्यासाठी पाठवले.
अंबरनाथ नगर परिषदेने या जागेवर पीपीपी तत्त्वावर रुग्णालय उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे स्पष्ट केल्यावर गिरासे यांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी एक आदेश काढत हा रुग्णालयाचा भूखंड पुन्हा पालिकेच्या ताब्यात दिला आहे. त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
नगर परिषदेने या भूखंडप्रकरणी कोणतीच भक्कम बाजू मांडली नव्हती. त्यामुळे हा भूखंड शासनजमा झाला होता. पालिकेने पुन्हा पाठपुरावा करून त्या जागेवर रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार केल्याची बाब कायदेशीर मांडल्यानंतर हा भूखंड रुग्णालयासाठी देण्यात आला आहे.
- जगतसिंह गिरासे,
उपविभागीय अधिकारी
ज्या भूखंडावर कोहोजगावच्या ग्रामस्थांनी अतिक्रमण होऊ दिले नाही, तो भूखंड शासनजमा झाल्याने आमचा संताप वाढला होता. त्यातच पालिकेने या भूखंडासाठी बाजू मांडली नव्हती. त्यामुळे आम्हाला या भूखंडासाठी संघर्ष करावा लागला.
- प्रदीप पाटील, गटनेते, काँग्रेस