ठाण्यातील वाचक कट्ट्यावर 'आम्ही सारे छंदानंदी ', वाचनप्रेमींची भरली मैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 04:37 PM2019-03-30T16:37:25+5:302019-03-30T16:39:00+5:30
वाचनप्रेमी छंदानंदींची मेहफिल वाचक कट्टा ४२ वर भरली आणि अनेक कथा उलगडल्या.
ठाणे : मनुष्याच्या जगण्याचा खरा आनंद मिळवण्याचा एकमेव स्रोत म्हणजे छंद कारण छंद जोपासनातना मनुष्य स्वतःला आवडणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींनी सजलेलं स्वतःच विश्व उभं करत कुणी रंगात रंगतो कुणी सुरांमध्ये रमतो कुणी खेळांमध्ये बेभान होतो आणि कुणी शब्दांच्या संगतीने आयुष्याचा वेगवेगळे अर्थ शोधतो.अशा वाचनप्रेमी छंदानंदींची मैफिल वाचक कट्टा ४२ वर भरली आणि अनेक रंजक कथा आणि कवितांचा नजराणा वाचक कट्ट्यावरील श्रोत्यांसमोर सादर झाला.
वाचक कट्टा ४२ ची सुरुवात डॉ.संध्या जोशी,गीता मानवतकर ,नयना खानोलकर ह्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. आयुष्यातील एका विशेष टप्प्यावर असलेल्या काही ज्येष्ठ वाचकप्रेमींनी एकत्र येऊन सुरु केलेला अभिवाचन रुपी कार्यक्रम म्हणजे 'आम्ही सारे छंदानंदी'. आयुष्याचा आनंद एकत्र येऊन शेयरिंग आणि केयरिंग पद्धतीने अनुभवणाऱ्या ह्या मंडळींनी त्यांच्या वाचनात आलेल्या काही कथा कवितांचे सादरीकरण वाचक कट्ट्यावर केले.सुप्रिया पाठक ह्यांनी 'कैकयी ची कैफियत', आशा रानडे ह्यांनी 'महाभारतातील एक वाचाळ मस्तक',विदुला अरुर ह्यांनी वैविध्य मांडणार ' जीवनातील अनेक गाठींशी सामना', सुधा डोळे ह्यांनी 'दानशूरपणा' ह्या अभिवाचन केले. बाळकृष्ण देशपांडे ह्यांनी 'ज्येष्ठांचे मनोगत' ह्यातून सध्याच्या ज्येष्ठांच्या भावविश्वाचे अभिवाचन केले. आशा घोलप ह्यांनी 'आजकाल बोकाळलेली अंधश्रद्धा' ह्या लेखाचे अभिवाचन केले.कुमुद पाटील ह्यांनी गीता आचरणात आणावी तर सुक्षम जीवन ह्या लेखाचे अभिवाचन केले. श्रीकांत होटे ह्यांनी साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या आठवणी अभिवाचनातून सादर केल्या. गजानन जोशी ह्यांनी गो.वि. करंदीकरांच्या 'न केलेले गुन्हे' ह्या लेखाचे अभिवाचन केले.आयुष्यात काही गोष्टी मनात राहून जातात आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ह्या मनातच घडतात त्याचे शाब्दिक चित्रण गजानन जोशी ह्यांनी अभिवाचनातून सुंदर सादर केले. न्यूतन लंके हिने शिरीष काणेकर लिखित 'स्वतः' आणि कुंदन भोसले ह्याने किरण पावसे लिखित 'एक क्रीमरोल' ह्या लेखांचे सादरीकरण केले. माधुरी गद्रे ह्यांनी पु.ल.देशपांडेंच्या काही आठवणी अभिवाचनातून श्रोत्यांसमोर मांडल्या तर तृप्ती भागात ह्यांनी स्वरचित 'मी कोण आहे ','प्रतिभाशाक्ती' ,'आई' ,'आर्ट फिल्म् ' ह्या कवितांचे अभिवाचन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अभिनय कट्ट्याचा कलाकार धनेश चव्हाण ह्याने विपुल महापुरुष लिखित 'लालटेन' एकांकिकेतील एक प्रसंग सादर केला . सादर वाचक कट्ट्यावर सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'आम्ही सारे छंदानंदी' च्या सर्व सभासदांनी वाचक कट्ट्याचे आभार मानले. मराठी भाषेचं अस्तित्व अस्मिता कुठेतरी हरवत चाललीय त्याचे संवर्धन करण्यासाठी वाचक कट्ट्याची स्थापना करण्यात आली. आज 'आम्ही सारे छंदानंदी' ह्या ज्येष्ठ वाचकांनी सादर केलेलं अभिवाचन येणाऱ्या तरुण वाचकांसाठी प्रेरणादायक ठरेल.वाचनसंस्कृती टिकवून ठेवणाऱ्या 'आम्ही सारे छंदानंदी' ह्या चमूचे खरंच कौतुक करण्यासारखे आहे .ह्या वयातही त्यांनी जोपसलेले छंद आणि त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाने आयुष्यात जोपासला पाहिजे तरच आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला उलगडेल.असे मत वाचक कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.वाचक कट्ट्यावर आपणही अभिवाचन सादर करू शकता.कारण वाचन हा असा छंद आहे जो स्वतःसोबत दुसऱ्यालाही आनंद देतो.त्यामुळे वाचक कट्ट्यावर प्रत्येकाने अभिवाचन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले.