आम्ही रडू तरी कुणासाठी, आजी की आई-बाबांसाठी; कोरोनाने कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 11:52 PM2021-05-02T23:52:36+5:302021-05-02T23:52:52+5:30
आटगावातील घटना : कोरोनाने एकाच घरातील तिघांचा मृत्यू, चिमुकल्यांचा आक्राेश
लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना आपल्या कवेत घेतल्याने अनेकांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कमावणारी व्यक्ती गेल्याने घर कसे चालणार, याची चिंता तर काही घरांतील दोन ते तीन व्यक्ती काही अंतराने गेल्याने घरात स्मशानशांतता पसरली आहे. आम्ही रडू तरी कुणासाठी, अशी चिमुकल्यांची परिस्थिती झाली आहे.
शहापूर तालुक्यातील आटगाव गावातील हरिश्चंद्र किरपण (४५) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर लगेचच पडघा येथे एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले व घरीच त्यांचा १९ एप्रिल रोजी मृत्यू झाला. इकडे त्याची आई सरस्वती (६५) यांनाही लागण झाल्यानंतर त्यांनाही सवाद येथे नेण्यात आले. मात्र त्यांनाही ऑक्सिजन न मिळाल्याने पुन्हा पडघे येथे आणण्यात आले. मात्र, त्यांचाही २३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू होतो न होतो तोच हरिश्चंद्र यांची पत्नी सीमा (३८) यांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर पडघा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच आपल्या सासू व पतीच्या दिवसांच्या दिवशीच मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना आटगाव येथे घडली. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथील आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यामुळे शहरात त्यांना दाखल होण्यासाठी यावे लागते.
आधीच शहरात आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना आमच्या माणसाला उपचार कसे मिळणार असा सवाल ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. सरकारने ग्रामीण भागातील व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.