आम्ही नव्हे, तर भाजपाच आमच्यासोबत

By admin | Published: May 18, 2017 03:47 AM2017-05-18T03:47:45+5:302017-05-18T03:47:45+5:30

भिवंडीच्या पालिका निवडणुकीत आम्ही भाजपासोबत गेलेलो नाही, तर भाजपा आमच्यासोबत आली आहे, हे आमच्या राजकीय विरोधकांनी लक्षात घ्यावे. समझोता त्यांनी केला

We do not, but the BJP with us | आम्ही नव्हे, तर भाजपाच आमच्यासोबत

आम्ही नव्हे, तर भाजपाच आमच्यासोबत

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी/अनगाव : भिवंडीच्या पालिका निवडणुकीत आम्ही भाजपासोबत गेलेलो नाही, तर भाजपा आमच्यासोबत आली आहे, हे आमच्या राजकीय विरोधकांनी लक्षात घ्यावे. समझोता त्यांनी केला आहे. त्यामुळे या समझोत्याला विरोध असणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप कोणार्क आघाडीच्या नेत्यांनी केला. निवडणुकीच्या काळातही आम्ही स्वतंत्र आहोत आणि निवडणुकीनंतरही स्वतंत्रच राहू, अशी ठाम भूमिका आघाडीचे सर्वेसर्वा विलास पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कोणार्क आघाडी भाजपात विलीन होण्याच्या शक्यतेची भाजपा नेते मुख्यमंत्र्यांना पुरवत असलेली माहिती ‘लोकमत’मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच निवडणुकीने तापलेल्या भिवंडीच्या राजकारणात एकच खळबळ उडली. संघाचा गणवेश घातलेल्या कोणार्कच्या नेत्यांच्या फोटोची चर्चा सर्वाधिक होती. त्यामुळे कोणार्क आघाडीचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले. नाराज झाले. पण भाजपाच्या नेत्यांनी मात्र मिठाची गुळणी धरत यावर अधिकृतपणे कोणतेही भाष्य केले नाही.
कोणार्क आघाडीने आजवर स्वतंत्रपणे राजकारण केले आहे. आताही आम्ही आमचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. आताही आमचे अस्तित्व स्वतंत्र आहे आणि निवडणुकीनंतरही स्वतंत्रच राहील. आम्ही भाजपात विलीन होणार नाही. उलट निवडणुकीच्या तोंडावर आमच्या आघाडीबद्दल अशा वावड्या उठवणे हा विरोधकांच्या राजकीय षडयंत्राचा भाग आहे, अशी तिखट प्रतिक्रिया कोणार्कचे नेते विलास पाटील यांनी व्यक्त केली.
कोणार्कच्या इतर नेत्यांनी तर भाजपाच्या जुन्या नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला. भाजपातील नव्या नेत्यांनी आमच्यासोबत केलेला समझोता त्यांना मान्य नसेल, तर त्यांनी ती भावना आपल्या नेत्यांच्या कानी घालावी, असे सांगतानाच भाजपाच्या नव्या नेत्यांनीही आमचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आमच्याशी समझोता केला आहे. आम्ही भाजपासोबत गेलेलो नाही, तर भाजपा आमच्यासोबत आली आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. भिवंडीच्या राजकारणात आमची स्वत:ची वेगळी ताकद आहे, ती त्यांच्यासह सर्व विरोधकांना स्वीकारावीच लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

आश्वासनाबद्दल
आम्ही काय सांगणार?
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना नेमके काय आश्वासन दिले आहे, त्याबद्दल आम्ही काय सांगणार असा प्रतिप्रश्न करत भाजपाच्या नेत्यांनी या बातमीबद्दल अधिकृतपणे भाष्य करण्यास नकार दिला. कोणार्क आघाडीशी समझोत्याबद्दल पक्षात वेगवेगळी मते होती आणि ती पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी मांडण्यात आली आहेत, एवढेच भाजपा नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. आम्हाला आणखी वाद वाढवायचा नाही, हेच पालुपद त्यांनी लावले.

संघ परिवारात आनंद
संघाचा नवा गणवेश घातलेल्या कोणार्क आघाडीच्या नेत्यांचा फोटो पाहून संघाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आनंद व्यक्त केला. दसरा मेळाव्यात ते नेते जर सहभागी झाले असतील, तर त्यांना संघाची विचारधारा नक्की समजली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; पण म्हणून कोणार्कशी झालेल्या समझोत्याचे आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका संघ कार्यकर्त्यांनी घेतली.

सोशल मीडियात एकच चर्चा
कोणार्कच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेले आश्वासन आणि जोडीला संघाच्या गणवेशातील कोणार्क आघाडीच्या नेत्यांचा फोटो असलेली ‘लोकमत’ची बातमी सकाळपासूनच सोशल मीडियावर गाजली. त्यावर सतत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

याचिकेवर सुनावणी होणार १९ मे रोजी
ठाणे : भिवंडी महापालिकेच्या रिंगणात उतरलेले कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख विलास पाटील अनधिकृत बांधकामाबद्दल प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य न केल्याने त्याविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे शरद पाटील यांनी ठाणे न्यायालयात दाद मागितली असून त्यावर १९ मे रोजी सुनावणी होणार आहे.
याच मुद्द्याच्या आधारे जर कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो, तर तो न्याय भिवंडीत का लावला नाही, असा सवाल पाटील यांनी केला आहे. त्यांचा अर्ज दाखल करून घेण्यात आला असून त्यावर न्यायाधीश वली मोहम्मद यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

Web Title: We do not, but the BJP with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.