आम्ही पकोडा विकण्याचे सांगून नोकऱ्या देत नाही, आम्ही प्रत्यक्ष रोजगार देतो - आदीत्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 07:52 PM2018-03-13T19:52:46+5:302018-03-13T19:52:46+5:30
ठाण्याच्या विकास कामात शिवसेनेचा मोठा वाटा असून आयुक्त देखील त्यानुसार शहरात विकासकामे करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी केले. तर दुसरीकडे आम्ही पकोडा विकण्याचे स्वप्न दाखवत नसून, आम्ही प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देत असल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी भाजपावर केली.
ठाणे - कोणी पकडो विकून नोकऱ्या देण्याचे सांगत आहे. परंतु शिवसेना मात्र प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात देशातील पहिले इन्व्होशेन केंद्र आणि स्टार्टअप संकल्पना राबविली जात असून त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी ठाणे महापालिका आयुक्तांना विकासकामांच्या बाबत पाठबळ देत भाजपाला त्यांनी अप्रत्यक्षपणे टारगेट करण्याचा प्रयत्न केला.
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने घोडबंदर रोड परिसरातील प्रभाग क्र मांक ३ व ४ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या दोन्ही पादचारी पूलांचा आणि जुने ठाणे - नवीन ठाणे या थीमपार्कचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सांयकाळी पाच वाजता शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार आणि स्वयंरोजगार यामधील फरकच समजत नसल्याने त्यांनी उच्चशिक्षित मुलांनी भजी विकावेत, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला होता. यावर आदीत्य ठाकरे यांनी समाचार घेतला. कोणी पकडो विकून नोकºया देण्याचे सल्ले देत आहेत. परंतु आम्ही प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देतो. याच कल्पनेतून ठाण्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्टार्टअप संकल्पना राबविली जावी अशी सुचना मी आयुक्तांकडे केली होती. आज त्या सुचनेची अमंलबजावणी होत असल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येत्या मार्च अखेर कोपरी पुलाच्या कामाला देखील प्रत्यक्षात सुरवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुलभ पध्दतीने उपलब्ध व्हावी यासाठी, अंतर्गत मेट्रो आणि पीआरटीएसची संकल्पना मांडली होती. आता या दोनही संकल्पना साकार करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणेकर उडत्या रिक्षातून प्रवास करतील याच शंकाच नाही, असेही त्यांनी सांगितले.
यापुढेही जाऊन शहरात टेनिससाठी प्रयत्न केले जावेत, त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. ठाण्यात आज मुंबईच्या वेगाने कामे होत आहेत, एका मागून एक मोठे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. हे केवळ ठाणेकरांनी शिवसेनेवर दाखविलेल्या विश्वासामुळेच होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु हे सांगत असतांनाच ठाण्यातील अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, स्टार्टअप, फुटबॉल टर्फ हे आपल्याच माध्यमातून आयुक्त साकार करीत असल्याचेही त्यांनी सांगत आयुक्तांना एक प्रकारे पाठबळ देत भविष्यात या प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाºया भाजपाला या निमित्ताने टारगेट केले.
- चौकट -
डोंबिवली हे सर्वात घाणेरडे शहर असल्याची टिका काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आदीत्य ठाकरे यांना छेडले असता, कोणी काही बोलो आम्ही आमचे काम करीत राहणार असल्याचे सांगितले.
- चौकट -
फुटबॉल टर्फला भाजपाच्या माध्यमातून विरोध केला जात असल्याचे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे यावर योग्य तो तोडगा काढून ठाणेकर खेळाडूंना फुटबॉल टर्फ उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर आयुक्तांसह इतरांनी त्यात लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यानुसार आदीत्य ठाकरे यांनी देखील याबाबत जे विरोध करीत असतील त्यांना एकत्र घेऊन त्यांचा विरोध नेमका कशासाठी हे जाऊन घेऊन यावर तोडगा काढला जावा अशी मागणी आयुक्तांकडे केली.