डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 08:02 PM2023-10-08T20:02:10+5:302023-10-08T20:02:34+5:30

नाटकी आंदोलन करायची आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे ही मनसेचे नेते अविनाश जाधव यांची सवय आणि स्थायीभाव आहे, असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे.

We do not show our faith with tears in our eyes; Anand Paranjape on Jitendra Awhad | डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला 

डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला 

googlenewsNext

ठाणे : शरद पवारसाहेबांबरोबर आमच्या पण भावना आहेत मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी आम्हाला देखील अश्रू अनावर झाले होते, याची आठवण करून देतानाच सारखे - सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील, असे वाटत नाही अशी मिश्किल टिप्पणीही आनंद परांजपे यांनी केली. 

माझ्याकडे पक्षाने ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्यामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही भूमिका असल्याचे स्पष्ट करत पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी घेईन, असे आनंद परांजपे म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेचे पद द्या अशी मागणी केली होती, हे सांगतानाच आता निवडणूक आयोगात लढाई सुरु झाली आहे. चिन्ह, पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईल, असे आनंद परांजपे यांनी सांगितले. 

याचबरोबर, नाटकी आंदोलन करायची आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे ही मनसेचे नेते अविनाश जाधव यांची सवय आणि स्थायीभाव आहे, असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे. आज ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. या टोल दरवाढीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील. या आंदोलनातून मात्र काही साध्य झाले नाही. हा ठाण्यापुरता विषय नाही तर मुंबईच्या एन्ट्री पाॅईंटसंदर्भातला प्रश्न आहे. त्यामुळे एमएच - ०४ संदर्भात दिलासा दिला पाहिजे अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे. 

आज राज ठाकरे ठाण्यात अविनाश जाधव यांचे उपोषण सोडण्यासाठी आले होते. ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अविनाश जाधव यांनी साखळी उपोषणाचे आंदोलन करुन कार्यकर्त्यांना वेठीस धरले. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटले तर या टोल दरवाढीवर तोडगा निघू शकतो असे सांगतानाच दर तीन वर्षांनी ५ रुपये वाढत असतात. २०१० पासून ते २०२६ पर्यंत हा करार झाला आहे असेही आनंद परांजपे यांनी सांगितले. 

२०१० साली हा झालेला करार आहे. राज्य शासनाने असा निर्णय घेतलाय त्यामुळे कंत्राटदार यातून लहान गाड्यांना मुंबई एन्ट्रीवर टोलमुक्ती देत नाही. टोलचा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती मिळावी अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे.  अविनाश जाधव हे नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात. खळखट्ट्याक करुन हे आंदोलन सुटणार नाही असा उपरोधिक टोलाही आनंद परांजपे यांनी यावेळी लगावला.
 

Web Title: We do not show our faith with tears in our eyes; Anand Paranjape on Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.