आम्ही आंबा ‘चोपून’ खाल्ला! राज यांचा भाजपाला टोला; मराठा आरक्षण, दुष्काळावरून हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 04:46 AM2019-05-14T04:46:58+5:302019-05-14T04:47:21+5:30
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते बोलत होते.
ठाणे : तुम्ही आंबा कापून खाता की चोखून, असा प्रश्न कॅनेडियन नागरिक अक्षयकुमार याने पंतप्रधानांना विचारला होता. ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो ‘चोपून’ खाल्ला, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना लगावला. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते बोलत होते.
आंब्याचा स्टॉल लावण्यावरून ठाण्यात झालेल्या मनसे - भाजपच्या वादावर ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शहरात त्यांचे स्टॉल लावून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मग त्या आंबा विक्रेत्याने काय घोडे मारले होते? शहरात भाजीपाला विकून शेतक-यांना चार पैसे मिळणार असतील, तर त्यांना त्यांचा व्यवसाय करू दिला पाहिजे. ते काही कायमचा स्टॉल लावणार नाहीत. शेतक-यांचे भले होत असेल, तर यात पक्षीय राजकारण आणायला नको, असेही त्यांनी सुनावले. या पार्श्वभूमीवर मनसेच्या स्थानिक नेतृत्वाखाली राज्यातील शेतक-यांचा १७ मे रोजी मोर्चा काढला जाईल. त्यात मी सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने महाराष्ट्रातील तरुणांशी राजकारण केले. मराठा आरक्षण मिळणारच नव्हते. हा विषय न्यायालयात जाणे निश्चित होते. मात्र त्यावर राजकारण करून सरकारला तरुणांची फसवणूक करायची होती. जो विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे, त्याची घोषणा राज्य सरकारने कशी केली, असा सवाल करत, खाजगी आणि सरकारी नोक-यांसह शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील तरुणांना प्राधान्य दिल्यास महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच राहणार नाही, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली.
एक लाख २० हजार विहिरी राज्यात बांधल्याचा दावा सरकारकडून केला जातो. तरीही राज्यातील सुमारे २९ हजार गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागत असतील, तर त्या विहिरी कुठे आहेत, हे तपासले पाहिजे. मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना, सिंचनाचा पैसा गेला कुठे़, असा सवाल त्यांनी केला. दुष्काळी दौ-यावर जाणा-या नेते मंडळीना राज यांनी धारेवर धरले. डिजिटल युगात एका क्लिकवर सर्व माहिती मिळत असताना, अभ्यास दौरे करणा-या नेत्यांना त्यांनी काय अभ्यास केला, हे पत्रकारांनी विचारायला हवे, असे त्यांनी सुचवले.
दुष्काळी टुरिझमला अर्थ नाही!
मी १० तारखेला दुष्काळ दौरा करणार असल्याची प्रसारमाध्यमांत आहे. प्रत्यक्षात मी तसा दौरा आखलेला नाही. दुष्काळी गावांत दयनीय परिस्थिती असते. त्यात दुष्काळी टुरिझम करण्यात काहीच अर्थ नाही. केवळ फिरण्यात अर्थ नाही. मात्र दुष्काळी गावांची माहिती आपण नक्की घेऊ, असे राज ठाकरे म्हणाले.
‘चुकीच्या गोष्टींवर विचारवंतांनी बोलावे’
हिंदू दहशतवादाबद्दल बोलताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही. त्यांनी देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊ नये. दहशतवादी हा दहशतवादी असतो, त्याचा धर्माशी संबंध नसतो. सरकारला दहशतवादी माहीत असेल, तर तो तिथल्या तिथे ठेचला पाहिजे; मात्र कोणतीही कृती करायची नाही आणि दहशतवादावर फक्त वाद घालून, लोकांची माथी भडकवण्यात अर्थ नाही. त्यावर राजकारण नको. मोदींनी या देशाला जी स्वप्ने दाखवली, त्यावर बोलावे. राजीव गांधी आणि पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांचा निवडणुकीशी काय संबंध, असा सवालही त्यांनी केला. देशात चुकीच्या गोष्टी घडत असतील तर विचारवंत, साहित्यिकांनी बोलले पाहिजे. नाहीतर विचारवंत म्हणून कशाला मिरवता, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान सुशिक्षित नव्हे, सुज्ञ असावा
अमित शहा यांनी नरेंद्र मोदी बीए, एमए असल्याचे प्रमाणपत्र दाखविले होते. त्यावर बोलताना राज म्हणाले, २०१४ साली भाजप सरकार आल्यावर आम्ही हे प्रमाणपत्र मागितले होते का? आमचा पंतप्रधान सुशिक्षित आहे का, हे आम्ही विचारले नव्हते, तर ते सुज्ञ असावेत, ही अपेक्षा होती.
पंतप्रधानांची उडवली खिल्ली
बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला त्या वेळी वातावरण ढगाळ होते. मात्र हे ढगाळ वातावरण देशासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे आपली विमाने रडारवर येणार नाहीत, या नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याची राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली. मोदींच्या या वक्तव्यामुळेच, ज्या कुणाला युद्ध करायचे असेल, त्याने ते पावसाळ्यात करावे, असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. त्यामुळे कुणी बॉम्ब टाकला, ते त्या देशाला कळणारच नाही, असा चिमटा त्यांनी काढला. या वक्तव्यामुळे देशाचे जगभरात हसू होत असल्याची मल्लिनाथीही त्यांनी केली.
टँकर लॉबीमुळे पाणीटंचाई
दुष्काळग्रस्त भागात तीन दिवसांनी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टँकर चालवणारी लॉबी कोणाची आहे? याचा राजकीय संबंध काय आहे? टँकर लॉबी चालविणारे राजकारणी असतील तर त्यांचा धंदा होण्यासाठी ते पाणी येऊच देणार नाहीत. लोकांना सहज पाणी मिळाले, तर त्यांचा धंदा कसा चालेल, असा सवाल करून, पाण्याच्या मुद्द्यावर काम करणाºया पाणी फाउंडेशनसारख्या सामाजिक संस्थांना जर पैसा मिळतो, तर सरकार काम का करत नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.