आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे
By अजित मांडके | Published: February 17, 2023 09:10 PM2023-02-17T21:10:01+5:302023-02-17T21:10:08+5:30
'आम्ही जो निर्णय घेतला, तो सर्वांना मान्य होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक जोडली गेली.'
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर ठाण्यात आनंद आश्रम येथे एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला.
शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यावरून मागील चार ते पाच महिने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वाद सुरू होता अखेर शुक्रवारी सायंकाळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलं त्यानंतर ठाण्यात विविध ठिकाणी शिंदे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला आनंद दिघे यांचा आनंद आश्रम या ठिकाणी सायंकाळी शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष केला यावेळी जोरदार फटाके वाजवून पेढे भरून हा जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, राम रेपाळे आदींसह इतर कार्यकर्त्यांनी या जल्लोषात सहभाग घेतला यावेळी हा आनंदोत्सव नाचून गाजून साजरा करण्यात आला. महिला आघाडीने देखील यावेळी फुगडी घालत जल्लोष केला.
आज सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेने पक्षात येत होते. तसेच आम्ही जो निर्णय घेतला, तो सर्वांना मान्य होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक जोडली गेली असून आज जो केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला. त्यावरून आज सत्याचा विजय झाला असल्याचे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आपण लढलो, केंदीय निवडणूक आयोगानेकडे गेलो. त्यात आज आयोगाने निकाल दिला. या निकालामुळे शिवसैनिक आनंदित झाला आहे. शिवसेना वाढीसाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या आयुष्यातील बराच काळ खर्ची केला आहे. एकनाथ शिंदे यांनी तर, वयाच्या सोळाव्या वर्षांपासून पक्ष संघटना बांधणीसाठी काम करीत आहेत. आज हिंदुत्वाचा विजय, बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाल्याचे त्यांनी सांगितले.