नेवाळी प्रकरणातून आम्ही खूप काही शिकलो- अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:00 AM2018-02-06T03:00:42+5:302018-02-06T03:00:48+5:30
नेवाळी हिंसाचार प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, असे म्हणण्यापेक्षा आम्ही या प्रकरणातून खूप काही शिकलो, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल, असे प्रतिपादन पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमध्ये केले.
कल्याण : नेवाळी हिंसाचार प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, असे म्हणण्यापेक्षा आम्ही या प्रकरणातून खूप काही शिकलो, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल, असे प्रतिपादन पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमध्ये केले.
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे शनिवारी बिर्ला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या दिलखुलास संवाद कार्यक्रमात दिघावकर प्रमुख वक्तेम्हणून बोलत होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना वैयक्तिक, शैक्षणिक आणि आतापर्यंत केलेल्या वाटचालीबाबत बोलते केले. पोलीस विभागात गुप्तचर विभाग कार्यरत असतो. परंतु, नेवाळी आंदोलन हिंसक होणार आहे. याची तयारी झाली आहे. त्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही. पोलीस या प्रकरणात कुठे कमी पडले का, असे प्रश्न दिघावकरांना या वेळी करण्यात आले. त्यावर प्रत्येक घडणारी घटना काहीना काही शिकवत असते. नेवाळी प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही परीक्षण केले आहे. पण, यातून आम्ही खूप काही शिकलो. यामध्ये चौकशीतून जे चुकले आणि ज्यांनी हलगर्जी केली, त्यांच्यावर कारवाईही झाल्याचे दिघावकर म्हणाले.
सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कायम त्यांच्या आवडत्या विषयात करिअर करायला हवे. त्यासाठी झपाटून जायला हवे. जेव्हा एखादे ध्येय नजरेसमोर ठेवता, तेव्हा तुम्ही शर्थीचे प्रयत्न केलेच पाहिजेत. ध्येयासाठी झपाटलेली व्यक्तीच इतिहास घडवते, असा विश्वास त्यांनी दिला.
आपला जीवनपट उलगडताना दिघावकर पुढे म्हणाले, नाशिकजवळच्या एका छोठ्या गावात माझा जन्म झाला. आमच्या गावात केवळ एक प्राथमिक शाळा होती आणि गावातील लोकांना शेती हाच एकमेव व्यवसाय होता. पण, लहानपणापासूनच मला सरकारी सेवेत जाण्याचा ध्यास होता. तो खरोखर गमतीदार प्रसंग होता. लहानपणी ज्यावेळी मी आकाशात विमान पाहिले होते. मी माझ्या आईला विचारले की, या विमानाचे मालक कोण आहेत? आणि ती सहजतेने म्हणाली की, ‘सरकार’. त्या वेळेपासून मला सरकारचा भाग व्हावेसे वाटू लागले. मी दिवसरात्र अभ्यास केला आणि दहावी शालान्त परीक्षेला बसलो. त्यानंतर, मी २३ किलोमीटर दूर असलेल्या महाविद्यालयात जाऊ लागलो. पण, कधीही खाडा केला नाही, तरीही ८६ टक्के गुण मिळवूनही मला आमच्या गावातील महाविद्यालयात एका गुणासाठी प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला शिक्षण सोडून देऊन शेती करण्याचा सल्ला दिला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी मी पूर्णत: शेती करू लागलो. पण, वडिलांशी पटले नाही. मी माझ्या मनातील शिकण्याच्या छंदाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मी आईकडून ३५० रु पये घेतले आणी दूरस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी मी शेतीमध्ये राबत होतोच आणि पदवी घेण्यासाठी रात्री जागून अभ्यासही करत होतो. वयाच्या अठराव्या वर्षी मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यासाठी मला एक हजार २५० रु पये खर्च आला. त्यानंतर, मी पोलीस सेवा परीक्षा दिली. त्याचवेळी १९८७ मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी संरक्षण विभागाचीही परीक्षा दिली. मी सहायक आयुक्तपदावर नियुक्त झालो, असे दिघावकर यांनी सांगितले.
अनेकदा नागरिक पोलिसांबाबत
तक्र ारी करतात, पण ते हे लक्षात घेत नाहीत की, आम्ही आमचे कर्तव्य करत असतो. आम्ही सारा वेळ कुटुंबापासून दूर राहतो आणि सण रस्त्यावर साजरे करतो. आम्ही २४/७ तैनात असतो आणि आमच्या कर्तव्यापेक्षा जास्त काहीच नसते, असे दिघावकर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत, सूत्रसंचालन निनाद करमरकर आणि आभार अरविंद म्हात्रे यांनी मानले.
>१९९३ बॉम्बस्फोट कठीण प्रसंग
१९९३ चे बॉम्बस्फोट आठवतात. हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग होता. या स्फोटाच्या तपासकार्यासाठी त्या काळात मी आणि माझे सहकारी सतत १८ तास काम करायचो, असे ते म्हणाले.
>संयुक्त राष्ट्रात
दिली भाषणे
२००० मध्ये मी आयपीएस अधिकारी झालो. मी गावात शाळा बांधली. १० हजार पोलीस शिपायांसाठी रहिवासी वसाहत उभारली आणि संयुक्त राष्ट्रात जाऊन भाषणे दिली. कारण, ते माझे स्वप्न होते, असे दिघावकर म्हणाले.