काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:20 IST2023-01-21T12:16:08+5:302023-01-21T12:20:43+5:30
जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत.

काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून ठाण्यातील जैन मंदिरामध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांनी मंदिरातील जैन धर्मगुरूंशी संवाद साधला. यावेळी काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच भूमिका तुम्ही बजावा, असे आवाहन जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले आहे.
ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये शनिवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान मंदिरात राज ठाकरे यांनी जैन धर्मगुरु श्रीमद विजय नित्यानंद सुरीषवर्जी म .सा. यांच्याशी चर्चा केली. यावेळी तुमच्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसते, आम्हाला अखंड भारत पाहिजे, काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता, बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे आवाहन जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले.
ठाणे : टेम्बी नाका येथील जैन मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दाखल (व्हिडिओ : विशाल हळदे)https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/XXIch0W7bc
— Lokmat (@lokmat) January 21, 2023
दरम्यान, राज ठाकरे यांचा महिन्याभरातील ठाण्याचा दुसरा दौरा आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत. यानंतर ते ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय असून येथून आता बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे कामकाज चालते. त्यामुळे टेंभीनाका परिसर हा संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाचे या भागात हे मंदिर आहे.
ठाणे : राज ठाकरे जैन समाजाच्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित, यावेळी जय महाराष्ट्र गाणे लावले. (व्हिडिओ : विशाल हळदे)https://t.co/JkFetXvxHCpic.twitter.com/8f1R8Os3NT
— Lokmat (@lokmat) January 21, 2023