ऑपरेशन महालक्ष्मी : मृत्यूच्या दाढेतूनच झाली आमची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:20 AM2019-07-29T00:20:15+5:302019-07-29T00:20:32+5:30
ऑपरेशन महालक्ष्मी : संदीप भाटलेकरने कथन केला थरार
निलेश धोपेश्वरकर
ठाणे : २६ जुलै ही तारीख मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही. त्यावेळच्या आठवणी आजही मुंबईतील नागरिकांच्या मनात घर करून आहेत. याचीच पुनरावृत्ती २६ जुलैला मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांबाबतीत झाली. वरून धोधो कोसळणारा पाऊस आणि गाडीबाहेर डोकावले, तर नजर जाईल तिथपर्यंत केवळ पाणीच दिसत होते. रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने गाडी हलण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे पाऊस थांबला नाही, तर आपले काही खरे नाही, अशी भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात आली आणि मग सुरू झाला देवाचा धावा. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आमची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली, अशा शब्दांत संदीप भाटलेकर या डहाणूच्या प्रवाशाने शनिवारच्या रात्रीचा थरार ‘लोकमत’शी बोलताना मांडला.
डहाणू येथे राहणारे भाटलेकर कोल्हापूर येथे एका कार्यक्रमासाठी जाण्याकरिता महालक्ष्मीच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होते. गाडी सीएसटीएम येथून सुटली, तेव्हा फारसा पाऊस नव्हता. कल्याण सोडले आणि पावसाचा जोर अधिक जाणवत होता, असे ते म्हणाले. अंबरनाथ, बदलापूर परिसरांत तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे आमची गाडी अंबरनाथ स्थानकाच्या अलीकडे दोन ते अडीच तास थांबली होती. पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साचले असेल. ओसरले की गाडी सुटेल, असा प्रवाशांचा समज झाला. रात्रही झाली असल्याने प्रवासी झोपले होते.
भाटलेकर म्हणाले, साधारण २ च्या सुमारास गाडी सुरू झाली. मी तोपर्यंत जागा होतो. त्यानंतर झोप लागली. गाडीने बदलापूर स्थानक सोडल्यावर ती थांबली. एसी डबा असल्याने बाहेर काय परिस्थिती होती, याचा अंदाजही येत नव्हता. पण, नंतर एसी बंद झाले. पंखे सुरू होते. मला पहाटे साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरहून मित्राचा फोन आला, तेव्हा आपण कर्जतही पार केले नाही, हे लक्षात आले, आणि डोळ्यांवरची झोप खाडकन उडाली.
चार किमी डोंगर उतरेपर्यंत जीवात जीव नव्हता
शनिवारी सकाळी ८ च्या दरम्यान पाऊस कमी झाला. एनडीआरएफचे पथक आल्यावर जीवात जीव आला. तोपर्यंत हेलिकॉप्टरही येऊन परिस्थितीची पाहणी करत होते. एनडीआरएफच्या जवानांनी सांगितले
की, चालत जाण्यासाठी पुरुष प्रवाशांसाठी गाडीपासून समोरील एका हॉटेलपर्यंत दोरी बांधली आहे. त्याला धरून जा, आमचे जवान, स्थानिक नागरिक मदतीसाठी आहेत. साधारण छातीभर पाण्यातून सामान घेत
दोरीच्या मदतीने आम्ही चालू लागलो. डोंगर उतरून चामटोली गावात उतरल्यावर, तेथे अधिकारी, पोलीस, एनडीआरएफचे जवान होते. त्यांनी आमच्याकडील बॅगा घेतल्या. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.
गाडी पुढे का सोडली?: मुसळधार पाऊस पडत होता, तर गाडी अंबरनाथच्या पुढे का नेली? अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकात ही गाडी थांबवली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.