विजयाची गुढी आम्हीच उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:31 AM2019-04-07T00:31:23+5:302019-04-07T00:32:13+5:30

दोन्ही उमेदवारांनी केला दावा : ठाण्यातील नववर्ष स्वागतयात्रेत जोमात रंगला प्रचार

We will build the victory! | विजयाची गुढी आम्हीच उभारणार!

विजयाची गुढी आम्हीच उभारणार!

googlenewsNext

ठाणे : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी ठाण्यातील मुख्य स्वागतयात्रेत आपापल्या परीने प्रचाराची रॅली काढून गुढीपाडव्यानिमित्त आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यात राजकीय रंग भरला. यावेळी सेनेचे राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी स्वागतयात्रेत सहभागी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी विजयाची गुढी आम्हीच उभारू, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला.


ठाण्यातील स्वागतयात्रेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, यंदा लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने यंदाची स्वागतयात्रा फारच चर्चेची ठरली. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेच्या वतीने कौपिनेश्वर मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे रथ सहभागी झाले होते. तसेच ठाण्याच्या संस्कृतीची माहिती देणारे रथ यावेळी विशेष आकर्षणाचा विषय ठरले होते. ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी सर्वात आधी या स्वागतयात्रेत आपली हजेरी लावली. यावेळी कौपिनेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यांनी कौपिनेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक हे देखील उपस्थित होते. परांजपे व नाईक यांनी डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. सेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्याही डोक्यावर भगवी टोपी होती. आनंद परांजपे हे अगोदरच स्वागतयात्रेच्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, उमेदवार राजन विचारे व शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वागतयात्रेत हजेरी लावली.


दरम्यान, अनेक सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले असल्याने आघाडीचे उमेदवार परांजपे आणि युतीचे उमेदवार विचारे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी युतीच्या नेत्यांनी विजयाची गुढी उभारू, असा विश्वास व्यक्त केला, तर आघाडीच्या नेत्यांनी परिवर्तनाची गुढी उभारू, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रात युतीची गुढी
मागील १८ वर्षांपासून ठाण्यात स्वागतयात्रा काढली जात आहे. या यात्रेची ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात. राष्टÑीय एकात्मता जपणारी ही स्वागतयात्रा आहे. त्यामुळे आता संपूर्ण ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रात युतीची गुढी उभी राहील.
- एकनाथ शिंदे,
पालकमंत्री, ठाणे जिल्हा

ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे. नववर्ष स्वागतयात्रा काढून आपण ही सांस्कृतिक परंपरा जपत आहोत. देशाच्या सुरक्षेकरिता पुन्हा केंद्रात आणि राज्यात मोदी सरकार येणार.
- राजन विचारे, लोकसभा उमेदवार, शिवसेना

नवीन वर्षात ठाणे शहर प्रगतीपथावर जाणार आहे, यासाठी समस्त ठाणेकर सज्ज आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचीच गुढी उभी राहील. असा माझा विश्वास असून ठाणेकरच आता योग्य तो निर्णय घेतील. - आनंद परांजपे, लोकसभा उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस


शिंदेंचा बाबाजींच्या खांद्यावर हात
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांची डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेत शनिवारी भेट घडली. दोघांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदे यांनी बाबाजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि अनेकांचे मोबाइल कॅमेरे हे दृश्य टिपण्यासाठी सरसावले.
गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शिंदे पश्चिमेतील भागशाळा मैदानाजवळील मोकशी बंगाल्यात आले. यावेळी संघाचे बापूसाहेब मोकाशी, मधुकर चक्रदेव, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आदी उपस्थित होते. या सगळ्यांसोबत शिंदे यांनी चहापान केले. त्यानंतर, स्वागतयात्रेला सुरुवात झाली. शिंदे यांनी अनेकांना भेटून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
शिंदे आई बंगल्याजवळ आले. तेथे स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी यात्रेत सहभागी झालेल्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. २०१४ सालीही मी यात्रेत सहभागी झालो, त्यावेळी नागरिकांना मी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या नागरिकांनी मताच्या रूपाने मला परत केल्या, असे शिंदे बोलले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे होते. आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचे तेथे आगमन झाले. शिंदे व पाटील यांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदे यांनी बाबाजींच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा सगळ्यांनी मोबाइल कॅमेऱ्यात हा क्षण टिपला. शिंदे व बाबाजी अत्यंत हळू आवाजात काही काळ कानगोष्टी करत होते, हसत होते व परस्परांना टाळी देत होते.
दरम्यान, कल्याण पूर्वेत डॉ. शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू स्वागतयात्रेत समोरासमोर आले. तेथे दोघांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, ते दोघे या उत्सवात सहभागी झाले.


शिंदे यांनी पहाटेच डोंबिवली गाठली. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात सकाळी ६ वाजताच जाऊन शिंदे यांनी गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर, ते डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात आले. या मैदानातून स्वागतयात्रेला सुरुवात होते. याठिकाणी मोकाशी बंगल्यात शिंदे आले, तेव्हा सगळ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: We will build the victory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thane-pcठाणे