शस्त्रसाठा २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:54 AM2018-07-08T05:54:42+5:302018-07-08T05:55:02+5:30
दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना आता शोधायची आहेत.
- राजू ओढे
ठाणे - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना आता शोधायची आहेत.
मुंबईतील गोरेगाव येथील क्रांती चाळीतून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी एके-५६ रायफल, तीन मॅगझिन्स, १०८ जिवंत काडतुसे आणि दोन पिस्टल हस्तगत केली. दाऊदचा एकेकाळचा हस्तक इक्बाल अत्तरवाला याच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या नईम खानच्या घरातून हा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
नईम खानला मुंबई पोलिसांनी २०१६ मध्ये अटक केली होती. त्यावेळी आपल्या घरातील एके-५६ पोलीस जप्त करतील, या भीतीने त्याने सर्व शस्त्रे सध्या अमली पदार्थ तस्करीच्या आरोपामध्ये ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नागपाडा येथील जाहीद अली शौकत काश्मिरी याच्याकडे दिली होती. त्याने जवळपास दोन वर्षे ही शस्त्रे सांभाळली. तीन महिन्यांपूर्वी ही शस्त्रे नईमच्या घरी पोहोचवण्याचा निरोप जाहीदला मिळाला. तेव्हापासून हा शस्त्रसाठा नईमच्या घरात होता.
पोलिसांनी नईमच्या घरातील एका पलंगातून हा शस्त्रसाठा हस्तगत केला. चिनी बनावटीची एके-५६ ही १९९७ सालच्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळलेली होती. त्यावरून ही रायफल १९९७ च्या आधीपासून नईमकडे असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. ठाणे पोलिसांच्या या धाडसी कारवाईने अनेक प्रश्नांना जन्म घातला आहे. नईमच्या चौकशीतून भविष्यात या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
दुसरी मोठी कारवाई
शस्त्रसाठा जप्तीची ठाणे पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नोव्हेंबर २००० मध्ये ठाणे पोलिसांनी दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट उधळवून लावला होता. त्या वेळी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांचा समावेश असलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या चार अतिरेक्यांना अटक करून एके-४७ सह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर, आता ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
दीपालीची झाली यास्मिन
नईम खानची पत्नी यास्मिन हिला पोलिसांनी अटक केली आहे. ती हिंदू असून तिचे खरे नाव दीपाली सुर्वे आहे. ती नईमच्या घराजवळच राहायची. तिने नईमसोबत प्रेमविवाह केला होता. तिचे वडील वारले असून भाऊ सुरत येथे हिरे उद्योगाशी संबंधित कामकाज करतो. नईमशी विवाह झाल्यानंतर दीपालीचे नाव बदलून यास्मिन ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही अल्पवयीन आहेत.