गोरेगावात राहत्या घरात सापडला शस्त्रसाठा, दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:09 PM2018-07-07T17:09:46+5:302018-07-07T17:11:57+5:30

ठाणे पोलिसांची कारवाई; दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीस अटक 

Weapons found in a house in Goregaon | गोरेगावात राहत्या घरात सापडला शस्त्रसाठा, दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीला अटक

गोरेगावात राहत्या घरात सापडला शस्त्रसाठा, दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीला अटक

googlenewsNext

ठाणे - ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री मुंबईतून गोरेगाव येथील बांगूर नगरमधील घरातून यास्मीन नईम खान (वय ३५) हिला एके ५६, ९५ जिवंत काडतुसे, ९ एमएमच्या २ पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझीन या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. यास्मीन ही महिला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील नईम या सदस्याची पत्नी आहे. नईमला मुंबई गुन्हे शाखेने २० एप्रिल २०१६ला अटक केली होती.

५ जुलै रोजी ठाण्यातील साकेत रोडवर कुख्यात ड्रग्स तस्करी करणारे येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून जाहिद अली शौकत काश्मिरी (वय ४७) आणि संजय बिपीन श्रॉफ (वय ४७) या नागपाड्यात राहणाऱ्या दोघांना शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत १० ग्रॅम कोकेन आणि १ लाख ५७ हजार २५० रुपये सापडले. त्यांना एनडीपीएस अॅक्टअन्वये अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलिसांच्या चौकशीत जाहिद या आरोपीने कुख्यात गुंड दाऊदचा सदस्य नईम फईम खानच्या बांगूरनगर येथील घरात शस्त्रसाठा असल्याची माहिती दिली होती.

त्यानुसार ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने गोरेगाव येथे काल रात्री धाड घालत यास्मीन नईम खानला एके ५६, ९५ जिवंत काडतुसे, ९ एमएमच्या २ पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझीन या शस्त्रसाठ्यासह अटक केली. या महिलेचा पती नईम खानला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० एप्रिल २०१६ रोजी भादंवि कलम ३०२, १२० (ब) आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात इतर ४ आरोपी अटकेत असून कुख्यात गुंड छोटा शकीलने दिलेल्या सुपारीवरून इक्बाल अत्तरवालाला ठार मारण्यासाठी आले असताना नईमला इतर चार साथीदारांसह रंगेहाथ पोलिसांनी पकडले होते. हे सर्व आरोपी ठाणे कारागृहात आहेत. यास्मीनकडे इतका शस्त्रसाठा कोणाकडून पुरविण्यात आला. तसेच ती कोणत्या गॅंगसाठी काम करत होती का ?, कोणाच्या हत्येचा कट रचला जात होता का ? अशा अनेक प्रश्नांची उकल पोलीस तपासात होणार आहे. 

Web Title: Weapons found in a house in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.