कोसळतानाही बदामाच्या झाडाने जपली माणुसकीची वीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:45 AM2021-05-25T04:45:22+5:302021-05-25T04:45:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,’ असे म्हटले जात असले तरीही अनेक वर्षे उभी असलेली ...

The weaving of humanity by the almond tree even after collapse! | कोसळतानाही बदामाच्या झाडाने जपली माणुसकीची वीण!

कोसळतानाही बदामाच्या झाडाने जपली माणुसकीची वीण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,’ असे म्हटले जात असले तरीही अनेक वर्षे उभी असलेली मोठमोठी झाडे दुर्दैवाने वादळ-वाऱ्यात उन्मळून पडतात. या झाडांनी त्यांच्या तहहयात ते अस्तित्वापर्यंत सावली आणि फळ, फुलांचे दान करण्याबरोबरच पक्ष्यांनाही निवारा दिलेला असतो. पूर्वेतील छेडा रोडवरील ३० वर्षांहून जुने असलेले बदामाचे झाड सोमवारी सकाळी हळुवारपणे समोरील इमारतीवर पडले. यात जीवितहानी आणि मोठी वित्तहानी टळली. त्याचबरोबर पक्ष्यांची घरटी आणि त्यातील पिल्लेही सहीसलामत होती. हानी टळल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला असताना दुसरीकडे अनेक वर्षांची सावली हरपल्याची खंत परिसरात व्यक्त होत आहे.

तौक्ते वादळामुळे १७ मे रोजी सर्वत्र मोठी हानी झाली. कल्याण-डोंबिवलीतही ३०० हून अधिक झाडे कोसळली. जोरदार वाऱ्यामुळे कमकुवत झाल्याने काहीशी जमिनीकडे कललेली, झुकलेली झाडे पडण्याचा सिलसिला अद्याप सुरू आहे. वादळात वाऱ्यामुळे काहीसे कललेले बदामाचे झाड सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास कोसळले. पूर्वेतील छेडा रोडवरील नवकार्तिक इमारतीच्या पदपथावर असलेले हे झाड समोरील रामनिवास इमारतीवर पडले. परंतु, ते कोसळताना अलगद पडल्याने पादचारी वेळीच सावध झाले. झाड कोसळण्याआधी पक्ष्यांचा मोठा किलबिलाट झाला. झाडाने रस्ता अडविल्याने वाहतूक बंद झाली. ते झाड जोरात पडले असते तर जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झाली असती. ही घटना घडताच याची माहिती तत्काळ डोंबिवली अग्निशमन दल आणि उद्यान विभागाला देण्यात आली.

अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन मारुती खिल्लारे, फायरमन नंदकुमार शेंडकर, अमित भगत, गिरीश घोडे, विकास शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत झाडाच्या फांद्या छाटण्यास सुरुवात केली. झाड तोडताना इमारतीला हानी पोहोचू नये म्हणून हायड्रा मशीनची आवश्यकता होती. परंतु, ती अग्निशमन विभागाकडे नाही. तसेच भाड्यानेही मिळाली नाही. अखेर झाड कटरने कापण्यात आले. मात्र, यात रामनिवास इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील काही घरांच्या गॅलरीतील पत्र्यांचे किरकोळ नुकसान झाले.

पक्ष्यांची दोन पिल्लेही सुखरूप

- अग्निशमन दलाच्या जवानांना झाडाचा बुंधा तोडताना त्यात पक्ष्याचे घरटे आणि त्यात दोन पिल्ले आढळली. फायरमन शेंडकर यांनी ते घरटे तेथून सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले.

- या कारवाईवेळी माजी नगरसेविका खुशबू चौधरी याही उपस्थित होत्या. ३० वर्षे दिमाखात उभे असलेल्या आणि ऊन-पावसात सावली आणि आधार देणाऱ्या बदामाच्या झाडाने कोसळतानाही जीवितहानी आणि वित्तहानी न करता माणुसकीची वीण जपली, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

------------

Web Title: The weaving of humanity by the almond tree even after collapse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.