वेबसीरिज चित्रणादरम्यान मारहाण; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:01 AM2019-06-21T04:01:26+5:302019-06-21T04:01:36+5:30
गायमुखच्या घटनेत एक फरार; पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप
ठाणे : वेबसीरिजच्या चित्रणादरम्यान शूटिंगस्थळी आलेल्या चौघांनी बेकायदेशीर जमाव करून सेटवरील संतोष तुंडेल, सोहम शहा आणि उदित पेडणेकर या तिघांना बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. त्यामध्ये संतोषच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच शूटिंगच्या व्हॅनिटी व्हॅनची काच फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुरुवारी दुपारी तिघांना अटक केली. यातील एक जण फरार असून अटकेतील तिघांना २४ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
याचदरम्यान मारहाणीनंतर कलाकार मंडळीने व्हायरल केलेल्या व्हिडीओत पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. परंतु, पोलिसांनी त्या आरोपाचे खंडण करून ज्यांनी मागणी केली, त्याच्याबाबत तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.
या मारहाणीप्रकरणी केलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर गुरुवारी दुपारी भार्इंदर पूर्व येथील कृष्णा अमरसिंग सोनार (३४), पालघरातील सोनू वीरेंद्र दास (२४) आणि भार्इंदर पूर्वेकडील सुरज महेंद्रनाथ शर्मा (२९) अशा तिघांना अटक केली. त्यानंतर, ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच फरार रोहित गुप्ता आणि अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच शूटिंगची कोणतीही परवानगी घेतली नव्हती आणि याबाबत संबंधितांनी पोलिसांनाही कळवले नसल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी सांगितले.
गायमुख येथे गर्दी झाल्याचे समजल्यावर पोलीस तेथे गेले. त्यावेळी एक जण साहित्याची आवराआवर करत होता. तसेच शूटिंग करणारे कलाकार तेथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काही कलाकारांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांनीच त्या आलेल्या लोकांना मारहाण करण्यास सांगितले. तसेच पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तो चुकीचा असून ज्यांनी मागणी केली, त्याची माहिती द्यावी, यासाठी त्यांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष पोटे पुढील तपास करत आहेत.
अशी घडली घटना
गोरेगाव येथे राहणारे आणि प्रॉडक्शन डायरेक्टर असलेले इम्पल आहुजा (३७) यांनी दिलेल्या तक्रारीत घोडबंदर रोडवरील गायमुख येथील एका बंद कंपनीत फिक्सर या वेबसीरिजचे शूटिंग चालू होते. त्यावेळी एकास्पॉट एजन्सीची काही मंडळी तेथे आली. त्यांनी बेकायदेशीर लोक जमवून काही कारण नसताना कलाकारांना बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शूटिंगसाठी लावलेल्या कॅमेऱ्याला धक्का देऊन तो खाली पाडला. तसेच व्हॅनची काच फोडून तिचे नुकसान केले.