लग्न सोहळे शाळांच्या मुळावर, लगाम घालण्यासाठी भाडेवाढीचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:56 AM2017-12-25T00:56:32+5:302017-12-25T00:56:35+5:30
ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता
ठाणे : ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, मुख्याध्यापक नसणे, त्यांची झालेली दुरवस्था या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही का, असा सवाल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारच्या महासभेत प्रशासनाला केला. शिवाय, या शाळा आणि मैदानांमध्ये सवलतीच्या दरात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यांमुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे अशा सोहळ्यांना लगाम घालण्यासाठी भाड्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लास रूम आणि डिजिटल शिक्षणाचे धडे यासंदर्भातील विषय चर्चेला आला असता, अनेक सदस्यांनी महापालिका शाळांच्या दयनीय अवस्थेचे पाढे वाचले. विद्यार्थ्यांची घसरती पटसंख्या ही चिंतेची बाब असून मनपा शिक्षकांबरोबरच ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. तर, कोपरीतील शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दा मालती पाटील यांनी उपस्थित केला. शाळांमध्ये संगणक आहेत, परंतु ते दुरुस्त केले जात नाहीत. हायटेक प्रणालीची भाषा आपण करतो. परंतु, अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची बाब या वेळी सदस्यांनी निदर्शनास आणली. शाळा क्रमांक १८ मध्ये तर आठवीचा वर्ग बंद करून त्यांना खुराड्यात हलवण्यात आल्याचा मुद्दा विकास रेपाळे यांनी उपस्थित केला. दिव्यातील शाळेत पटसंख्या जास्त असतांनादेखील तिचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याची खंत राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. पंखे बंद, लाइट नाही, शौचालयांची अवस्था बिकट अशा परिस्थितीत हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणार तरी कसे, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ढोकाळी येथील महापालिकेच्या शाळेत तर हळदीचा सोहळा रंगला होता. त्यामध्ये मारामारी झाली आणि काहींनी या शाळेतील बेंचेस, लाइट आणि इतर साहित्य तोडल्याचा आरोप दस्तुरखुद्द महापौरांनी केला.