कर्जत तालुक्यातील उल्हासनदी पात्रात होतो लग्नसोहळ्याचा थाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:12 AM2021-03-04T00:12:20+5:302021-03-04T00:12:26+5:30

कृषिपर्यटन, हॉटेल, रिसॉर्ट मालकांवर स्थानिकांनी केली कारवाईची मागणी

The wedding ceremony takes place in Ulhasnadi Patra in Karjat taluka | कर्जत तालुक्यातील उल्हासनदी पात्रात होतो लग्नसोहळ्याचा थाट 

कर्जत तालुक्यातील उल्हासनदी पात्रात होतो लग्नसोहळ्याचा थाट 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातून वाहत असलेल्या उल्हास नदीचा वापर लग्नसोहळ्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वापर नेरळ जवळ असलेल्या नदी काठी वसलेल्या कृषी पर्यटन-हॉटेल व्यावसायिक-रिसॉर्ट मालक यांच्या माध्यमातून सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी पर्यटन-हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट मालकांवर करवाईची स्थानिकांकडून मागणी होत आहे. तर उल्हास नदीच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
 सगळीकडे लग्नसराईची धाम धूम सुरू आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाकडून लग्नसोहळ्यासाठी नियम घालून दिले असले तरी हे नियम सर्वच ठिकाणी पालन होत नसल्याचे चित्र समोर येत आहेत. तर उपस्थितांच्या समोर राजेशाही थाट पद्धतीने लग्न सोहळे पार पाडण्यासाठी वधू-वराच्या घरच्या मंडळींकडून अमाप पैसे खर्च केले जात असून,आपलाच सोहळा इतरांपेक्षा वेगळा कसा हे देखील दाखवले जात आहे.
     एकीकडे लग्न सोहळ्यासाठी फार्म हाऊस, हॉटेल मालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत ग्राहकांना आमिष दाखवण्याचे काम करत आहेत. यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील उल्हास नदी काठावरील व्यावसायिकांनी चक्क नदीचा वापर करून नदीकाठ रोषणाईने सजवण्यात आला आहे.  
पाण्यात लग्न सोहळ्याचे मंडप थाटले असून,नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रशासन,पाटबंधारे विभाग पोलीस यंत्रणा यांच्या डोळ्यात धूळ फेकत लाखो रुपये हे व्यावसायिक कमविण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.
    एकीकडे उल्हास नदी संवर्धनासाठी बचाव समित्या कार्यरत आहेत. हजारो गाव वाड्या व लाखोंच्या संख्येने जीवांची तहान भागवणाऱ्या या उल्हास नदीत दूषित पाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीने जागा काबीज केली आहे. यामुळे उल्हास नदीचे पाणी दूषित होत असल्याचे चित्र समोर असताना, आता लग्न सोहळ्यासाठी या नदीचा विनापरवाना वापर होत असल्याने, तालुक्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
      त्यातूनच तालुक्यातून नदीतीरावर वसलेल्या हॉटेल, कृषी व्यावसायिकांकडून नदीत थाटले जाणारे लग्न सोहळे यांच्यावर संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणार का? की याच व्यावसायिकांकडून संबंधित अधिकारी वर्गाचे हात तर ओले करण्यात आले नाहीत ना? असा प्रश्न स्थानिकांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
 

Web Title: The wedding ceremony takes place in Ulhasnadi Patra in Karjat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.