उल्हासनगरात वीज मंडळाच्या कार्यालयाची तोडफोड; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:15 PM2019-06-19T23:15:59+5:302019-06-19T23:16:13+5:30
विजेच्या लपंडावाला नागरिक त्रासले
उल्हासनगर : विजेच्या लपंडावाला कंटाळून संतप्त झालेल्या नागरिकांनी १७ सेक्शन येथील वीज मंडळाच्या कार्यालयाची मंगळवारी मध्यरात्री तोडफोड केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता यू.आर. ठाकूर यांनी दिली.
उल्हासनगरचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी थेट ऊर्जामंत्र्यांना निवेदन दिले, तर संतप्त नागरिकांनी साई मंदिर येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून याबाबत जाब विचारला. भारिपचे शहराध्यक्ष सुधीर बागुल यांनी विजेच्या लपंडावाच्या निषेधार्थ बेमुदत उपोषणही सुरू केले. वीज मंडळाविरोधात शहरात संतापाचे वातावरण असताना, मंगळवारी कॅम्प नं.-३ परिसरात रात्री साडेनऊ वाजता वीज गुल झाली. रात्रीचे १२ वाजले तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने, संतप्त नागरिकांनी सेक्शन १७ मधील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली.
ही माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात धाव घेतली. तोडफोडीचा पंचनामा करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता ठाकूर यांनी दिली. तोडफोडीमुळे बुधवारी वीज मंडळ कार्यालयातील कामकाज बंद होते. कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने, तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना त्रास होत आहे. वीजपुरवठा नेतिवली येथील सबस्टेशनवरून बंद झाल्याने, कॅम्प नं.-३ मधील काही भागांत वीजपुरवठा बंद असल्याचे ठाकूर म्हणाले.
वीज मंडळाविरोधात वातावरण
पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला असून, दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. या प्रकाराने नागरिक हैराण झाले असून, उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता वीजबत्ती गुल झाल्यावर मध्यरात्री १ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे वीज मंडळाच्या कार्यालयाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.