भिवंडीतील भादवड पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्वागत कमान धोकादायक; पोलीस यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By नितीन पंडित | Published: March 28, 2023 06:01 PM2023-03-28T18:01:24+5:302023-03-28T18:01:32+5:30
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत असलेल्या भिवंडीतील भादवड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राची लोखंडी स्वागत कमान धोकादायक बनली आहे.
भिवंडी-ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत असलेल्या भिवंडीतील भादवड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राची लोखंडी स्वागत कमान धोकादायक बनली आहे.या स्वागत कमानीच्या सुरक्षेसाठी बनविण्यात आलेले वीट व सिमेंटचे बांधकाम असलेली भिंत देखील जीर्ण झाली असून एका बाजूला तुटल्याने स्वागत कमान एका बाजूला झुकली आहे.त्यामुळे ही लोखंडी कमान कधीही कोसळण्याची भीती या ठिकाणी असलेल्या पोलीस वसाहतीतील रहिवासी व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे याबाबत भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाला या कमानीच्या दुरावस्थेबाबत वारंवार सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या धोकादायक स्वागत कमानीकडे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यककक्षेत भिवंडीतील भादवड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र असून येथील मैदानावर दररोज शेकडो तरुण खेळण्यासाठी तसेच पोलीस प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी येत असतात. या प्रशिक्षण केंद्राच्या बाजूलाच भिवंडीतील पोलीस वसाहत असून अनेक पोलीस कुटुंब येथे राहण्यासाठी आहेत. या पोलीस वसाहतीतील परिवाराचा येण्या जाण्याचा मार्गावर असलेली ही स्वागत कमान धोकादायक झाली आहे.या धोकादायक स्वागत कमानी बाबत पोलीस वसाहतीतील रहिवाशांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडे निवेदने तक्रारी केल्या आहेत. मात्र शासकीय यंत्रणांचे या गंभीर प्रश्नांकडे पुरता दुर्लक्ष झाला आहे त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून नादुरुस्त झालेली स्वागत कामान त्वरित दुरुस्त करण्यात येईल किंवा शक्य झाल्यास ती स्वागत कमान बदलण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.