लेझीम,टाळ मृदुंगाच्या गजरात नववर्षाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 11:25 AM2018-03-18T11:25:50+5:302018-03-18T11:25:50+5:30
सालाबादप्रमाणे यंदाही कल्याण संस्कृती मंच यांच्यावतीने काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सनई चौघडे आणि लेझीम, टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गस्थ होणाऱ्या स्वागत यात्रेला शहराच्या मुख्य चौकात ढोल पथकांच्या वतीने सलामी देण्यात आली.
कल्याण - सालाबादप्रमाणे यंदाही कल्याण संस्कृती मंच यांच्यावतीने काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सनई चौघडे आणि लेझीम, टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गस्थ होणाऱ्या स्वागत यात्रेला शहराच्या मुख्य चौकात ढोल पथकांच्या वतीने सलामी देण्यात आली. स्वागतयात्रेतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जलजागृतीपर संदेश देण्यात आला.
गुढीपाडव्या निमित्त निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. हिंदू धार्मिक सण आणि त्यांचे महत्व सांगणारे चित्ररथ, देखावे अशी संकल्पना यावर्षी होती. यंदा कल्याण संस्कृती मंच संचालित नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष कल्याणधील व्यावसायिक गौतम दिवाडकर हे होते. सिंडिकेट येथून सकाळी सात वाजता यात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते गुढीचे पुजन करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेविका विणा जाधव, माजी नगरसेवक गणेश जाधव, स्वागताध्यक्ष दिवाडकर संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. वसंतराव काणे, कार्यवाह श्रीराम देशपांडे, सहकार्यवाह अतुल फडके, उद्योजक अमित धात्रस, शरद वायुवेगळा आदि मान्यवर उपस्थित होते. गुढी पुजनानंतर निघालेली यात्रा सुभाष चौक, रामबाग, सहजानंद चौक, शिवाजी चौक, अहिल्याबाई चौक, गांधी चौक, पारनाका, लाल चौकी येथून मार्गस्थ होत नमस्कार मंडळ येथे यात्रेचा समारोप झाला. स्वागत यात्रेच्या मार्गावर संस्कार भारती रांगोळया काढण्यात आल्या होत्या. बालशिवाजी आणि बाजीराव पेशवा यांच्या वेशभूषा साकारुन बालक घोड्यावर तर महिला आणि तरुणी फेटा आणि नऊवारी साडी असा मराठमोळा वेष परिधान करुन दुचाकीवर सहभागी झाल्या होत्या. बेटी बचाओ बेटी पढाव, स्वच्छ कल्याण सुंदर कल्याण, पर्यावरण संवर्धन या लक्षवेधी चित्ररथांसह केडीएमसीच्या वतीने जलजागृती सप्ताहानिमित्त चौकाचौकात सादर झालेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. यात्रेच्या मार्गावर संस्कृती आणि राज या ढोलपथकांनी आपल्या सादरीकरणाने विशेष दाद मिळविली. रामबाग आणि अहिल्याबाई चौकात मार्गस्थ होणाऱ्या यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तत्पुर्वी संतीशी माता मंदीर रोडवर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. विशेष बाब म्हणजे टिळक चौक परिसरात दुरुस्तीसाठी बंद असलेले अत्रे नाट्यगृह लवकर सुरू व्हावे म्हणून टिळक चोकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली तर याच ठिकाणी भावगीत आणि भक्तीगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रेदरम्यान खासदार कपिल पाटील, नगरसेवक प्रकाश पेणकर, शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांनीही उपस्थिती लावली होती. नमस्कार मंडळ येथे गुढी उभारून स्वागत यात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी कल्याण शहरातील प्रसिद्ध काळा तलाव येथे दिव्यांची रोषणाई व आवाज विरहित फटाक्याची आतिषबाजीचा आगळा वेगळा कार्यक्रम देखील करण्यात आला.