उत्तरा चौसाळकरांच्या गायनाला रसिकांची दाद
By Admin | Published: October 11, 2015 10:16 PM2015-10-11T22:16:27+5:302015-10-12T00:26:48+5:30
‘स्वरानुरागी’ बाऊल गीतगायन : ऐलमा पैलमा समूहातर्फे धुरीवाडा येथे आयोजन
मालवण : शहरातील धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित दादासाहेब शिखरे सभागृहात ऐलमा पैलमा समूह, कोकण मराठी साहित्य परिषद आणि बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वरानुरागी’ बाऊल संगीत-गीत गायनाचा सोहळा झाला. ठाण्याच्या गायक कलाकार डॉ. उत्तरा चौसाळकर यांच्या बाऊल गीत गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ऐलमा पैलमा सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐलमा पैलमा समूहातील प्रा. सुमेधा नाईक यांनी या समूहाचे वेगळेपण, कार्यक्रमाचे औचित्य आणि स्वरुप श्रोत्यांसमोर विषद करुन सर्वांचे स्वागत केले. ऐलमा पैलमा समूहातील कुडाळमधील ज्येष्ठ सदस्या नलिनी कुवळेकर यांनी रुजवणाचे पूजन केले व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या अध्यक्षा व ऐलमा पैलमा सदस्य वैशाली पंडित यांनी डॉ. उत्तरा चौसाळकर यांची सविस्तर ओळख सर्वांना करून दिली.चौसाळकर यांनी सुरुवातीला बाऊल संगीताची पार्श्वभूमी स्पष्ट केली. बाऊल गीते बंगाली भाषेत असल्यामुळे त्यानी आधी प्रत्येक गीताची संकल्पना विषद केली. अमेय पंडित यांनी या बंगाली गीतांचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. प्रत्येक बाऊल गीतापूर्वी वैशाली पंडित या अनुवादित कविता अत्यंत रसाळ शैलीत सादर करीत होत्या. त्यामुळे रसिकांना या संगीतमय कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घेता आला. डॉ. उत्तरा यांनी गीत गायनासोबतच एकतारी व डुग्गी या वाद्याची साथ दिल्यामुळे हे गायन अधिकच रंगले होते. त्यांच्या नाजूक पदन्यास व घूंगुराच्या मंजूळ आवाजाने श्रोत्यांमधून वाहवा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी मालवणमधील कीर्तनकार मेधा शेवडे यांनी उत्तरा यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. (प्रतिनिधी)