भले बुरे ते घडून गेले... जरा विसावू या वळणावर...या वळणावर

By admin | Published: February 15, 2017 04:43 AM2017-02-15T04:43:15+5:302017-02-15T04:43:15+5:30

ठाण्यातील अनेक प्रेमी युगुले व नवपरिणीत जोडपी ‘व्हॅलेंटाईन डे’साजरा करण्यात मश्गुल असताना वर्तननगर पोलीस ठाण्यात पती-पत्नी एका

Well it turned out to be bad ... Just turn it on ... at the turn of this | भले बुरे ते घडून गेले... जरा विसावू या वळणावर...या वळणावर

भले बुरे ते घडून गेले... जरा विसावू या वळणावर...या वळणावर

Next

जितेंद्र कालेकर / ठाणे
ठाण्यातील अनेक प्रेमी युगुले व नवपरिणीत जोडपी ‘व्हॅलेंटाईन डे’साजरा करण्यात मश्गुल असताना वर्तननगर पोलीस ठाण्यात पती-पत्नी एका चोरीच्या प्रकरणावरून आपला संसार विस्कटायला निघाले होते. त्यांचा लहानगा मुलगा केविलवाणा झाला होता. एरव्ही खाकी वर्दीचा हिसका दाखवण्याकरिता ओळख असलेल्या पोलिसांनी अत्यंत हळूवारपणे या वादाचे पदर पती-पत्नीसमोर उलगडले आणि प्रेम दिनाच्या दिवशीच सुखी संसारावर निखारा ठेवायला निघालो होतो ही चूक उभयतांना उमजली. एक संसार मोडता मोडता वाचला.
आनंद (३८) आणि स्मिता पवार (३५) यांचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्यांना पाच वर्षांचा अमेय हा मुलगाही आहे. (तिघांचीही नावे बदलली आहेत) स्मिताच्या माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली. पतीही चांगल्या कंपनीत मोठया हुद्दयावर. पत्नीने घरातून सात ते आठ लाख रुपयांचे दागिने चोरल्याची व ते आपल्याला न सांगता कुणा परपुरुषाला दिले असल्याच्या संशयातून सूडाने पेटलेला नवरा १३ फेब्रुवारी रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. प्रचंड संतापलेल्या आनंदची बाजू पोलीस उपनिरीक्षक एस. एल. भापकर यांनी ऐकून घेतली. दुसरी बाजू ऐकल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नाही, असे भापकर त्याला वारंवार सांगत होते. एकदा का गुन्हा दाखल झाला की तुमचा संसार तर मोडेलच, शिवाय तुम्हाला न्यायालयात खेटे घालावे लागतील. भापकर समजावणीच्या सुरात आनंद यांना सांगत होते. मग वरिष्ठ निरीक्षक के. जी. गावीत, भापकर आणि जमादार बुगडे यांनी स्मिताला विश्वासात घेऊन तिचीही बाजू ऐकली. यावेळी वेगळेच वास्तव समोर आले. संसाराला हातभार लावावा आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा या हेतूने स्मिताने शाळा सुरु केली. उधार-उसनवारीने पैसे घेऊन शाळेमध्ये गुंतवले. किमान १०० विद्यार्थी मिळण्याऐवजी जेमतेम १० ते १५ मुले शाळेत आली. पैसा गुंतून पडला. खर्चाचा ताळमेळ लागत नव्हता. लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे? या विचाराचा भुंगा स्वस्थ बसू देत नव्हता. पतीने लग्नात बनविलेले सात ते आठ लाखांचे दागिने तिने मोडले. त्यातून अनेकांची देणी दिली...
छोट्या अमेयला भूक लागली होती. आईचे झरणारे डोळे पाहून तोही रडवेला झाला होता. कधी आईला बिलगुन तर कधी वडलांच्या हनुवटीला स्पर्श करून त्यांचा छोकरा भूक लागल्याचं सांगत होता. भापकर ते न्याहाळत होते. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घ्याल तर पत्नी माहेरी जाईल. तुमचेही दुसरे लग्न होईल. पण या मुलाचे काय, त्याला एकाचवेळी आई-वडील कुठून मिळतील. त्याचा विचार तुम्ही करणार की नाही, असा प्रश्न भापकर यांनी दोघांना केला. दोघांनीही अमेयला उराशी गच्च धरलं. ते त्याच्या केसातून, गालांवरून प्रेमपूर्वक हात फिरवू लागले. भापकरांनी तक्रारीची वही बंद केली आणि ते पोलीस ठाण्याच्या बाहेर पडणाऱ्या त्या तिघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते...

Web Title: Well it turned out to be bad ... Just turn it on ... at the turn of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.