कल्याणमधील ‘ती’ विहीर बुजवणार, केडीएमसी आयुक्तांचा पाहणीनंतर घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 05:31 AM2018-11-04T05:31:47+5:302018-11-04T05:32:09+5:30
चक्कीनाका परिसरातील विहिरीत पडलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. ही दुर्घटना घडलेली विहीर बुजविण्यात येणार आहे
- मुरलीधर भवार
कल्याण - चक्कीनाका परिसरातील विहिरीत पडलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. ही दुर्घटना घडलेली विहीर बुजविण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.
अपघातग्रस्त विहीर व परिसराची पाहणी बोडके यांनी शनिवारी केली. या वेळी महापालिकेचे बेकायदा बांधकाम नियंत्रक सुनील जोशी उपस्थित होते. विहिरीतील गाळ काही प्रमाणात काढल्याने शुक्रवारी ती ७५ टक्के पाण्याने भरली होती. विहीर परिसरातील प्रदूषणप्रकरणी जोशी यांनी सनराइज, बेलकम, सोलर या कंपन्यांची पाहणी केली होती. त्यापैकी एका कंपनीला त्यांचा कारखाना तीन दिवस बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. तर, अन्य दोन कंपन्यांना त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते.
दोन अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तिन्ही कारखान्यांच्या पाहणीनंतर तिन्हीपैकी एकाही कारखान्यातून सांडपाणी गटारात सोडले जात नसल्याची माहिती दिली होती. मात्र, महापालिका अधिका-यांनी कारखान्यांना नोटीस दिल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा ठरला आहे. एका कारखान्यात वापरले जाणारे सल्फर नाल्यावाटे गटारातील सांडपाण्यात मिसळते, ही बाब जोशी यांना पाहणीदरम्यान आढळली होती. तर, दुसरीकडे गटारात सांडपाणी सोडले जात नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला. त्यावर, महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांची स्वाक्षरी आहे. कारखान्यांतून सांडपाणी नाल्यात मिसळत नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या दोन अधिकाºयांत समन्वय नसल्याचे समोर येत आहे.