टंचाईच्या काळात विहिरींचा आधार
By admin | Published: March 14, 2016 01:47 AM2016-03-14T01:47:45+5:302016-03-14T01:47:45+5:30
पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.
भार्इंदर : पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.
आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. यंदा त्यात वाढ झाली आहे. शहरासाठी पाण्याचा नवा स्रोत नसल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. या कपातीमुळे आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीतील जलसाठ्याचा वापर करण्याचा विचार प्रशासनस्तरावर सुरू झाल्यानंतर त्याला काही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्याची नितांत आवश्यकता यंदा जाणवू लागली आहे.
शहरात सुमारे डझनभर सार्वजनिक विहिरी, ११ तलाव असा सहज उपलब्ध होणार जलसाठा आहे. शिवाय, मर्गाळी तलाव व चेना नदीचे अस्तित्व आहे. यातील मर्गाळी तलाव सध्या एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत गेल्याने पालिका हद्दीत असलेल्या चेना नदीतील पाणी टँकरद्वारे उपसा करून ते पिण्याखेरीज इतर वापराकरिता देण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुरेश काकाणी यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, हे पाणी उपसणे अव्यवहार्य असल्याचा फतवा काढून त्याला प्रतिसादच मिळाला नसल्याचे कारण अधिकऱ्यांनीच पुढे केल्याने ती प्रक्रिया बासनात गुंडाळली आहे.
शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्या नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करण्याचे आदेश देऊनही त्याकडे आजतागायत दुर्लक्ष केले आहे. परंतु, याच विहिरी ऐन कपातीच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरत आहेत. स्टेम व एमआयडीसीने गुरुवार ते शनिवारदरम्यान शहराला पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्वच नळ कोरडे पडल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी थेट सार्वजनिक व खाजगी विहिरींकडे मोर्चा वळवून गरज भागवली. जोपर्यंत कपात लागू आहे, तोपर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्यातील पाणीकपातीच्या काळात द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.