चार कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:24 AM2021-07-03T06:24:59+5:302021-07-03T06:25:24+5:30
झडतीमध्ये चार किलो १०० ग्रॅम इतकी व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या नंदकुमार वासुदेव दाभोळकर (५७, रा. विरार) आणि मंगेश जावळे (४२, कांदिवली, मुंबई) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून चार कोटींची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.
व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने असा एक मोठा समज आहे. हा पदार्थ स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. त्याची आंतरराष्टीय बाजारपेठेत करोडो रुपयांची किंमत आहे. त्याच व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी दोघे जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली होती.
त्याआधारे १ जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास जुना जकातनाका, घोडबंदर रोड येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे आणि उपनिरीक्षक बाबू चव्हाण आदींच्या पथकाने सापळा लावून मोटारसायकलीवरुन आलेल्या दाभोळकर आणि जावळे या दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये चार किलो १०० ग्रॅम इतकी व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.