रेल्वे समांतर रस्त्यावर दुचाकींच्या सुरक्षेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:52 AM2018-10-05T05:52:56+5:302018-10-05T05:53:15+5:30
रिक्षांना मिळाले स्टॅण्ड : सम-विषम, सशुल्क पार्किंगसाठी वाहतूक पोलीस पाठवणार प्रस्ताव
डोंबिवली : वाहनतळाअभावी ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकात मोठ्या प्रमाणावर दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. तेथेच भाडे मिळवण्यासाठी रिक्षांचीही रांगचरांग लागत असल्याने याचा फटका कल्याणकडे जाणाऱ्या वाहतुकीला बसत होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने मांडताच डोंबिवली वाहतूक पोलीस शाखेने त्याची गंभीर दखल घेत स्वतंत्र रांग लावण्यास रिक्षाचालकांना भाग पाडले. परंतु, उघड्यावर उभ्या केल्या जाणाºया वाहनांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाकुर्लीतून जाणारा रेल्वे समांतर रस्ता हा कल्याण-डोंबिवलीत येजा करण्यासाठी सर्वात जवळचा रस्ता आहे. या परिसराच्या झालेल्या विकासात मोठमोठी संकुले उभी राहिल्याने या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, तेथील लोकवस्तीच्या तुलनेत संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी फारशा सुविधा दिलेल्या नाहीत. वाहनतळ नसल्याने नोकरदारवर्गाला आपली दुचाकी वाहने नाइलाजास्तव म्हसोबा चौकात उभी करून रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे. तेथेच रिक्षांचीही रांग लागत असल्याने सकाळी आणि सायंकाळी रहदारीच्या वेळेस वाहतूककोंडी होते. याबाबत, ‘लोकमत’ने ‘वाहनांचे पार्किंग वाहतुकीच्या मुळावर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत चौकातील पार्किंगमध्ये बदल करून रिक्षांची स्वतंत्र रांग लावण्यात आली आहे, यासाठी बॅरिकेड्स टाकण्यात आले आहेत. त्यात विरुद्ध दिशेने वाहने चालवली जात असल्याने तेथेही बॅरिकेड्स टाकून अन्य चालकांनाही शिस्त लावण्यात आली आहे.
चौकातील वाढते पार्किंग पाहता ‘पी’-१ ‘पी’-२ (सम-विषम) तसेच पे अॅण्ड पार्किंगचा प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एन.सी. जाधव यांनी दिली.