रेल्वे स्थानकातून फेरीवाले हटले पण अवैध पार्क होणा-या दुचाकींचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 06:48 PM2017-11-27T18:48:37+5:302017-11-27T18:49:37+5:30
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे. त्यासंदर्भात प्रवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार दिली, त्या लोकप्रतिनिधींनीही ठिकठिकाणच्या स्थानक प्रबंधकांशी त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला पण ती समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला पादचारी पूलालगत दुषचाक्या पार्क केल्या जातात. मुंबईसह विविध भागांमध्ये जाणारे चाकरमानी त्या ठिकाणी दुचाक्या लावतात, तसेच ठाकुर्लीतही स्थानक परिसरात दुचाकी लावण्यात येतात. सकाळी पार्क झालेली वाहने संध्याकाळी साडेसातनंतर तर काही गाड्या मध्यरात्री काढण्यात येतात. त्यामुळे या अवैध गाडयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. गाड्या अवैधपणे पादचारी पुलाच्या दुतर्फा पार्क करण्यात येत असल्याने त्याचा त्रास जा-ये करणा-या प्रवाशांना होतो. सकाळी घाईगर्दीच्या वेळेत ती अडचण आणखी वाढते. त्यामुळे नेमके कोणाकडे दाद मागायची असा सवाल प्रवाशांना पडतो. ठाकुर्ली आणि कोपर या दोन्ही स्थानकात पूर्णवेळ स्थानक प्रबंधक बसत नाहीत. त्याचा फायदा घेत गाड्या पार्क करण्यात येत असल्याची टिका स्थानिकांनी केली. रेल्वे प्रशासनाने ठाणे, डोंबिवली, कल्याण यांसह अन्य स्थानकांच्या बाहेर वाहनतळाची सोय केली आहे. तशी सुविधा या ठिकाणीही करावी, जेणेकरुन प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही अशी अपेक्षा म्हात्रेनगरचे रहिवासी अमित कासार यांनी केली.
कोपर स्थानकातील सहाय्यक स्थानक प्रबंधकांसह डोंबिवलीचे तत्कालीन स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटीया यांना वेळोवेळी पत्र देंण्यात आली आहेत, मात्र त्याचा काहीही फरक पडला नाही. आता रेल्वेच्या वरिष्ठांशी संपर्क करावा लागेल - मुकुंद पेडणेकर, नगरसेवक
रेल्वेने दुचाकी गाड्यांसाठी वाहनतळ बनवावे, त्यासाठी योग्य तो दर आकारावा. पार्किंग धोरण बनवावे, जेणेकरुन गाड्या लावतांना शिस्त लागेल. पण तसे होत नाही. त्याचा त्रास नागरिकांना का असावा? - सुलिन मिश्रा, ठाकुर्ली