डम्पिंगचा धंदा कोणामुळे?
By admin | Published: December 10, 2015 01:55 AM2015-12-10T01:55:59+5:302015-12-10T01:55:59+5:30
दिव्यातील डम्पिंगजवळच्या रसायनांच्या पिंपाला लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वारंवार आंदोलने करूनही सीआरझेडच्या हद्दीत
ठाणे : दिव्यातील डम्पिंगजवळच्या रसायनांच्या पिंपाला लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वारंवार आंदोलने करूनही सीआरझेडच्या हद्दीत नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने डम्पिंग सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
रसायनांच्या आगीमुळे झालेल्या वायुबाधेचा फटका बसलेल्या दिव्यातील रहिवाशांनी बुधवारी पालिकेच्या गाड्या अडवून धरत आपला संताप व्यक्त केला. दिवसाढवळ््या सर्व सरकारी यंत्रणांसमोर दिवावासीयांचा, आसपासच्या गावांचा जीव धोक्यात टाकणारे रसायनमाफिया राजरोस वावरत असूनही त्यांच्याकडे कानाडोळा केला जात असल्याबद्दल नागरिकांनी आक्रमक भावना व्यक्त केली. बेकायदा पद्धतीने रसायने ओतली जात असल्याने हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागल्याचे म्हणणेही स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मांडले.
मंगळवारच्या दुर्घटनेवेळी ५८ पैकी तीन ड्रम फुटले. जर उरलेली पिंपेही फुटली असती तर भोपाळसारखी मोठी दुर्घटना घडली असती. डम्पिंगजवळच ही घटना घडली असली तरी पालिका सीआरझेडच्या जागेत बेकायदा डम्पिंग चालवित असल्याचे उघड झाले आहे. सततच्या विरोधानंतरही हे डम्पिंग ग्राऊंड सुरू असल्याने त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या डम्पिंगवर २००५ पासून दररोज २०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना श्वसनविकार जडले आहेत. याविरोधात अनेकवेळा रास्ता रोको, पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला, पण फरक पडलेला नाही.
>आधारवाडीत कचरा बंद आंदोलन
कल्याण : मनाई हुकूम असतानाही येथिल आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर केडीएमसीकडून कचरा टाकणे अद्यापही सुरूच आहे. याचा नाहक त्रास तेथील स्थानिक रहिवाशांना होत असून त्यात परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी देखील भरडले जात आहेत. या निषेधार्थ गुरूवारी डंपिंग ग्राऊंड येथे सकाळी ९ च्या सुमारास ते ‘कचरा बंद’ आंदोलन छेडणार आहेत.
डंपिंगच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारून महापालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करण्यास मनाई केली आहे. यावर घनकचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भात निविदांच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला असला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आजघडीलाही डंपिंगची समस्या जैसे थे च असून कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, पेटणाऱ्या कचऱ्याचे धुराचे लोट यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी अण्णा भाऊ साठे नगर वसले असून येथील लोकसंख्या हजारोंच्या आसपास आहे. तसेच या परिसरात महाविद्यालय आणि शाळादेखील आहेत. त्यामुळे या प्रदूषणाचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून डंपिंग बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.