उद्याने कसली? ती तर चक्क बनली आहेत डम्पिंग ग्राउंड
By admin | Published: April 17, 2017 04:43 AM2017-04-17T04:43:33+5:302017-04-17T04:43:33+5:30
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले महात्मा गांधी उद्यान तसे आकाराने मोठे. तीन भागांत विभागले आहे. पूर्वी या उद्यानात वर्दळ असे.
महात्मा गांधी उद्यान
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले महात्मा गांधी उद्यान तसे आकाराने मोठे. तीन भागांत विभागले आहे. पूर्वी या उद्यानात वर्दळ असे. नागरिक फेरफटका मारण्यासाठी यायचे. लहान मुले हमखास खेळण्याकरिता येथे यायचे.
परंतु, पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे या उद्यानाचे रूपडे पालटले. तुटलेल्या खेळण्या, दारूच्या बाटल्या, गर्दुल्ल्यांचा वावर, अस्वच्छता यांच्या विळख्यात हे उद्यान अडकले आहे. या उद्यानाच्या डाव्या बाजूला पूर्वी खेळण्या होत्या. त्यातील आता एक खेळणे मोडकळीस आल्याने कोपऱ्यात पडले आहे.
गर्दुल्ल्यांची ही जागा अड्डाच बनली आहे. डम्पिंग ग्राउंडसारखा कचरा या ठिकाणी असतो. ओसाड पडलेल्या या जागेत तुटलेली बाकडी सर्रासपणे आढळतात. उद्यानाच्या मधल्या भागामध्ये खेळणी आणि बैठक व्यवस्था असली तरी दुरवस्थेचा पाढा या भागात वाचायला मिळतो. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यापासून समस्याच समस्या नजरेस पडतात.
झाडे सुकलेली असून उद्यानाच्या एका भागात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. या उद्यानात सी-सॉ, घसरगुंडी, झोपाळा यासारख्या ११ खेळण्या असून त्या सर्व मोडकळीस आल्या आहेत. घसरगुंडी पत्र्याची असल्याने ती पूर्णपणे चेपलेली आहे. यामुळे लहान मुलांना जखम होण्याची भीती आहे. उद्यानाची संरक्षक भिंत आणि जाळी पूर्णपणे तुटलेली आहे.
माता रमाबाई आंबेडकर उद्यान
कॅडबरी जंक्शन येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यान हे ओसाड पडलेले आहे. या उद्यानाच्या बाहेर हे उद्यान सुशोभित करण्यात आले असल्याची पाटी लावली असली, तरी आतून मात्र या सुशोभीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. या उद्यानात कुणीही फारसे फिरकत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. एका बाजूला सुकलेल्या पालापाचोळ्याचा ढीग, तर दुसऱ्या कोपऱ्यात गंजलेल्या अवस्थेतील डीपी उघड्यावर पडलेला आहे. झाडे तर सुकलेली असून आसनव्यवस्थाही तुटलेली आहे. या उद्यानात दुरवस्थेतील बैठकव्यवस्था आणि कोणतीही खेळणी नसल्याने हे उद्यान ओसाडच पडले असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
सावित्रीबाई
फुले उद्यान
हिरवळीबाबत हे उद्यान संपन्न असले, तरी उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेली कमान पूर्णपणे खराब झाली आहे. उद्यानाच्या बाहेर असलेल्या पायऱ्यांवर रेबिटचा कचरा टाकण्यात आलेला आहे. या उद्यानात स्वच्छ आणि सुस्थितीतील पाणपोई हवी, अशी नागरिकांची मागणी आहे.
मो.दा. जोशी बालोद्यान
लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या या उद्यानात पूर्वी असलेली हिरवळ पूर्णपणे नाहीशी झाली आहे. येथे जवळपास १५ ते १६ खेळण्या असून बहुतांश खेळण्या तुटलेल्या आहेत. पाण्याचीही सोय नाही. खेळण्यांचे अस्तित्वच राहिलेले नाही. सुरक्षारक्षकांची केबिनही धूळखात आहे.
उद्याने पर्यावरणस्नेही असावीत
ठाण्यातील उद्यानांच्या सद्य:परिस्थितीबाबत मी प्रचंड नाराज आहे. या उद्यानांमध्ये अनेक बदल घडवावे लागतील. एकाच दृष्टिकोनातून उद्यानांकडे पाहून चालणार नाही. उद्याने ही पूर्णत: पर्यावरणस्नेही असावीत, असे उद्यान अभ्यासक सचिन टेमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.उद्यानात चांगली, भारतीय झाडे असावीत. परंतु, उद्यानांमध्ये जी झाडे लावली जातात, त्यांचा अभ्यास केला जात नाही. अनेक ठिकाणी पर्जन्यवृक्षं लावण्यात आली आहेत. परंतु, या झाडांना कीड लागत चालली आहे, असेही ते म्हणाले. उद्यानात पाहिले तर ठरावीक प्रकारचीच झाडे लावली जातात. त्यात विविधता आणण्याची गरज आहे. आजघडीला हवा शुद्ध करणारी सक्षम झाडे उद्यानात लावली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ही झाडे मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन देतात. मात्र, उद्यानांमध्ये लावण्यात येणारी झाडे फार हलक्या दर्जाची आहेत. विरंगुळ्याबरोबरच झाडांचा अभ्यास करणारे उद्यान होण्याची गरज आहे. पक्ष्यांना फायदेशीर ठरतील, अशी झाडे उद्यानात असायला हवी. ठाणे ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता सामाजिक बांधीलकी म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करणारी उद्याने तयार व्हावीत, असे त्यांनी सांगितले.
सर्वोदय उद्यान
या उद्यानात प्रवेश केल्यावर नजरेस पडतात, ती दोन्ही बाजूंनी असणारी गंजलेल्या अवस्थेतील प्रवेशद्वारे, तुटलेल्या पायऱ्या आणि उद्यानातील दुर्गंधी. हे उद्यान ठाणे पूर्वेतील सर्वात मोठे उद्यान आहे. पूर्वी या उद्यानात खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत असे. फिरण्यासाठी परिसरातील नागरिकांसह इतर परिसरातील नागरिकदेखील येत असत. परंतु, उद्यानातील गर्दी कमी होत चालली आहे. याला एकमेव कारण म्हणजे दुरवस्था, असे नागरिकांनी सांगितले. या उद्यानामध्ये तयार करण्यात आलेल्या पदपथांच्या लाद्या निघालेल्या आहेत. उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी एक छोटा पूल तयार करण्यात आला होता. त्याच्या डाव्या बाजूला कारंजे उभारण्यात आले होते. या कारंजामागे सर्रास लोखंडी सामानाचा कचरा टाकून देण्यात आला आहे. ४० वर्षांपासून या उद्यानात येत आहे. या ठिकाणी पाणपोई कधीही स्वच्छ नसते. पूर्णपणे दुर्लक्षित झालेले उद्यान असल्याचे या ठिकाणी फेरफटका मारण्याकरिता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. उद्यानाच्या एका कोपऱ्यात तुटलेली खेळणी टाकून दिली आहेत, तर दुसऱ्या बाजूला वीज नसल्याने एका भागात अंधाराचे साम्राज्य, तर काही भागात उजेड असल्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणाले. काही वर्षांपूर्वी उद्यानात जुनी गाणी ऐकायला मिळायची. परंतु, आता तेही बंद झाले, असे त्यांनी सांगितले. या उद्यानाची संरक्षक भिंतही मोडकळीस आली आहे.