काशीमीरातील शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणण्यात कोणती माणुसकी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:21+5:302021-09-16T04:50:21+5:30
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस जय बजरंगनगरमधील एका शौचालयप्रकरणी माणुसकीचा कळवळा दाखविणाऱ्या महापालिकेने काशीमीरा येथील ३०० कुटुंबांना कोरोनाकाळ ...
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस जय बजरंगनगरमधील एका शौचालयप्रकरणी माणुसकीचा कळवळा दाखविणाऱ्या महापालिकेने काशीमीरा येथील ३०० कुटुंबांना कोरोनाकाळ आणि भर पावसाळ्यात बेघर करीत त्यांचे संसार उद्ध्वस्त करून कोणती माणुसकी दाखवली, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी बुधवारी केला.
जय बजरंगनगर या सरकारी कांदळवनमध्ये वसलेल्या झोपडपट्टीसाठी महापालिकेने २०१९ साली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत बेकायदेशीरपणे शौचालय बांधले होते. वन कायद्याखाली गुन्हा दाखल होणार म्हणून पालिकेने पर्यायी व्यवस्था न करताच शौचालय काढून टाकले. त्यावरून राजकारण तापल्यानंतर बजरंगनगरमधील राहिवाशांसाठी माणुसकी म्हणून स्वखर्चाने मोबाईल शौचालय ठेवल्याचे भाजपने सांगितले होते. या प्रकरणी नागणे म्हणाले की, भाजपने माणुसकीचे ढोल बडवत मोबाईल शौचालय आणून ठेवले असले तरी अजूनही ते वापरात नाहीत.
दुसरीकडे माशाचा पाडा येथील आरक्षण जागेतील पक्की घरे बिल्डरला टीडीआर द्यायचा म्हणून अचानक जाऊन तोडण्यात आली. आरक्षित जागेवर बांधकाम उभारून लोकांना घरे विकणारे, सोयीसुविधा पुरविणारे व संरक्षण देणारेही तितकेच दोषी आहेत. घरखरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक झाली असताना कोरोना संसर्गात व भर पावसाळ्यात सुमारे ३०० घरे तोडून लोकांना उघड्यावर आणताना माणुसकी कुठे गेली, असा सवाल नागणे यांनी केला आहे.