जिल्ह्यांची मुस्लीम नावे बदलून काय साधणार?, आमदार अबू आझमी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 08:14 AM2023-01-23T08:14:56+5:302023-01-23T08:15:09+5:30
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लीम असल्याने ती बदलण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे.
भिवंडी :
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लीम असल्याने ती बदलण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे. फक्त जिल्ह्यांची नावे बदलल्याने राज्याचा आर्थिक विकास साधणार नाही. नोकऱ्या वाढणार नाहीत. चिरकूट लोकांनी दिलेल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी भिवंडीत सांगितले.
आझमी यांच्या खासगी सचिवास आलेल्या धमकीच्या दूरध्वनीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे मत व्यक्त केले. जुन्या शहरांची नावे बदलण्यापेक्षा नवी शहरे बनवा. त्याला हवे त्यांचे नाव द्या. आम्हाला काहीही हरकत नाही, असेही अबू आझमी म्हणाले.
‘तुम्ही केवळ मुस्लीम धर्मातच लग्न करा’
देवी-देवता, राष्ट्रपुरुष, धर्म, धर्मग्रंथांवर बरळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. मुस्लीम तरुण-तरुणींनी लग्न करताना मुस्लीम धर्मातच लग्न करावे, जेणेकरून धार्मिक तेढ वाढणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.