बेकायदा विदेशी नागरिकांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्यात गैर काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:26 AM2020-01-19T01:26:58+5:302020-01-19T01:28:17+5:30
आताचे महाराष्ट्रातील राजकारण ज्या टप्प्यावर उभे आहे. राजकीय नैतिकता अजिबात उरलेली नाही. मत कोणत्या विचारांना दिले, कोणत्या पक्षाला दिले, त्याने कोणाशी युती केली.
- अभिजित पानसे, मनसे नेते
हिंदुत्वाची भूमिका आधी घेतली, नंतर घेतली असा भागच नाही. झेंड्यामध्ये प्रामुख्याने भगवा रंग आहे आणि मनसेची सर्वसमावेशक अशी भूमिका कायम राहिलेली आहे. मनसेची भूमिका ही महाराष्ट्राकरिता आहे. महाराष्ट्रात जेवढे घटक आहेत, त्या घटकांना कायम सामावून घेणारा मनसे हा पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाची वेगळी भूमिका असा भाग येण्याचा प्रश्न नाही. भूमिका तीच असेल मात्र काही गोष्टी बदलतील, हे नक्की. जसे की, ज्याप्रमाणे आताचे महाराष्ट्रातील राजकारण ज्या टप्प्यावर उभे आहे. राजकीय नैतिकता अजिबात उरलेली नाही. मत कोणत्या विचारांना दिले, कोणत्या पक्षाला दिले, त्याने कोणाशी युती केली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता आज शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. पण भाजपनेही त्याच चिखलात उडी मारली आणि राष्ट्रवादीबरोबर गेले. ज्या अजित पवारांबाबत इतके बोलले, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसशी कदापि युती करणार नाही, असे बोलत होते. नंतर मात्र त्यांच्यासोबतच गेले. महाराष्ट्राचे राजकारण इतके सत्ताप्रिय झाले आहे, की लोकं महाराष्ट्राविषयी कधी काय करू शकतात, ही भूमिका वेगळी राहिली. आता मात्र एकमेकांना वाचविणे आणि एकमेकांना हात धरून आपापली दुकाने चालविणे अशा वळणावर राजकारण आले आहे. सगळ्यांना राजकारणाचा तिटकारा आला आहे. अशा वेळेला मनसेची महाराष्ट्रवादी भूमिका आहे आणि ही प्रकर्षाने पुढे येईल. लोक राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्व म्हणून पाहत आहेत. आधी काय झाले मनसेचे किंवा नंतर काय झाले, पण आता या टप्प्यावर निदान एक महाराष्ट्रातील राजकीय व्यक्ती महाराष्ट्राविषयी बोलतेय, हे लोकांना कळेल आणि त्यांना कळतं. त्यामुळे आमचे स्थान दिवसेंदिवस प्रबळ होत जाईल. जे महाराष्ट्रात मराठी बोलतात, मराठी वाचतात त्या लोकांसाठी मनसे कायमस्वरुपी आहे. पुण्यात, मुंबईत पाहिले तर जैन, गुजराथी हे लोक उत्तम मराठी बोलतात ते मराठी आहेत, असेच आम्ही मानतो आणि त्या मराठी लोकांना सामावून घेणे, ही मनसेची कायम भूमिका आहे.
मीडियाच्या अपप्रचारामुळे मनसेची भूमिका एकांगी असल्याचे काही लोकांचे विनाकारण मत आहे. पण तसे अजिबात नाही. मुंबई सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात तर इतर जाती धर्माचे लोक उत्तम मराठीत व्यवहार करतात. मुंबईतही हे घडले पाहिजे आणि त्याचमुळे मनसेची कधीपासून मागणी होती की, कोणतेही बोर्ड असले तरी मराठी विषय अनिवार्य हवा, त्याची घोषणा झालेली आहे. पण त्याची अंमलबजावणी कितपत होते हा महाराष्ट्रसमोर कायम प्रश्न राहिलेला आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांना हाकलवून देण्याचा प्रश्न हा एका विशिष्ट समाजापुरता नाही. आता नायजेरियन आले आहेत, त्यांना आपल्या घरात ठेवायचे आहे का? त्यांना लाथ मारुन पाठविले पाहिजे.
भारतात अवैधरीत्या आलेल्या कोणत्याही माणसाला लाथ मारुन पाठविले पाहिजे तरच शिस्त राहील. हे लोक येणार अनधिकृत बांधकाम करून वाट्टेल तिथे झोपड्या बांधणार, चिरीमिरी देणार. राज ठाकरे वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना विनंतीवजा सांगत आहेत की, आपली माती, आपली आई विकू नका. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. जे पिढ्यान्पिढ्या इथे राहत आहेत, ते महाराष्ट्रातील मराठीच आहेत. मनसे भाजपसोबत जाणार यात काहीही तथ्य नाही. कारण, मनसे आतापर्यंत एकटी लढलेली आहे आणि एकटीच लढेल. या चर्चेला काहीही अर्थ नाही. भेटीगाठी होत असतात, भेटीगाठी झाल्या म्हणजे त्याचा लगेच राजकीय अर्थ काढू नये.
- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे