उल्हासनगर महापालिकेत चाललेय तरी काय? लिपिकावर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 06:53 PM2020-12-19T18:53:31+5:302020-12-19T18:53:42+5:30

Ulhasnagar Municipal Corporation :  वरिष्ठांना डावलून लिपिकाला थेट वर्ग-१ च्या कर संकलक पदाचा पदभार

What's going on in Ulhasnagar Municipal Corporation? | उल्हासनगर महापालिकेत चाललेय तरी काय? लिपिकावर मोठी जबाबदारी

उल्हासनगर महापालिकेत चाललेय तरी काय? लिपिकावर मोठी जबाबदारी

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर विभागातील रिक्त वर्ग-१ च्या कर निर्धारक संकलक पदी वरिष्ठ अधिकार्यांना डावलून थेट लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांची प्रभारी नियुक्ती केल्याने महापालिकेत चालले तरी काय? असे म्हणण्याची वेळ आली. तसेच प्रभारी उपकर निर्धारक संकलक पदीही लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. 

उल्हासनगर महापालिकेचे एका तत्कालीन आयुक्तांनी उल्हासनगरात काहीपण होऊ शकते. अशी टिप्पणी एका सार्वजनिक कार्यक्रमात करून शहरात होत असलेल्या कामकाजावर अप्रत्यक्ष टीका टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीचा वेळोवेळी प्रत्येय शहरवासीयांना येतो. महापालिका मालमत्ता कर विभाग नेहमी वादात राहत असून यापूर्वी तत्कालीन विभागाच्या उपायुक्तासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. तसेच त्यानंतरही अनेक प्रकार उघड झाले आहे. शासन प्रतिनियुक्तीवर अधिकारी न आल्याने, विभागाचे वर्ग-१ चे कर निर्धारक संकलक पद गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त आहे. विभागाचे उपायुक्त व उपकर निर्धारक संकलक असलेले नितेश रंगारी यांच्यासह कर निरीक्षक विभागाचे कामकाज बघत होते. दरम्यान कोरोना महामारी काळात विभागाची कर वसुली घटून उत्पन्न ठप्प पडले. उत्पन्न वाढविण्यासाठी विभागाने घरपोच मालमत्ता कर बिलाचे वाटप करून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.

 महापालिका मालमत्ता कर विभागाच्या वर्ग-१ च्या कर निर्धारक संकलक पदी वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना डावलून वरिष्ठ लिपिक असलेले जेठानंद करमचंदानी यांची प्रभारी पदी नियुक्ती केली. तसेच लिपिक असलेले उद्धव लुल्ला व मनोहर गोखलानी यांची उपकर निर्धारक संकलक पदी प्रभारी म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीने सर्वस्तरातून टीका होत आहे. एलबीटी विभागातील गैरप्रकाराबाबत १६ जणांना तत्कालीन आयुक्तांनी निलंबित केले होते. त्यामध्ये या तिन्ही अधिकाऱ्याची नावे असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उपकर निर्धारक संकलक असलेले नितेश रंगारी यांना महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख पदी नियुक्ती केली. रंगारी यांच्याकडून वैयक्तिक कारणामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या विभाग प्रमुख केल्याचे लिहून घेतल्याची चर्चाही रंगली आहे. उपायुक्त मदन सोंडे यांना याबाबत संपर्क केला असता होऊ शकला नाही.

अनुभव लक्षात घेऊन पदभार.....उपमहापौर

 महापालिका उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागातील गेल्या ९ महिन्यात समाधानकारक वसुली झाली नाही. त्यामुळे महापालिका आर्थिक डबघाईला आली असून त्यामधून बाहेर काढण्यासाठी ३० वर्षाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांची कर निर्धारक संकलक व उपकर निर्धारक संकलक पदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. प्रभारी कर निर्धारक संकलक पदी नियुक्ती झालेले जेठानंद करमचंदानी व उद्धव लुल्ला, मनोहर गोखलानी यांच्याशी संपर्क झाला नाही.

Web Title: What's going on in Ulhasnagar Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.