शिधावाटप दुकानातील गहू, तांदळाची काळ्याबाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:00+5:302021-07-29T04:40:00+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं. ४ मधील श्रीरामनगर येथील शिधावाटप दुकानातील गहू व तांदूळ जादा किमतीने काळ्या बाजारात विकणारा दुकानदार ...
उल्हासनगर : कॅम्प नं. ४ मधील श्रीरामनगर येथील शिधावाटप दुकानातील गहू व तांदूळ जादा किमतीने काळ्या बाजारात विकणारा दुकानदार मधुकर सुरवाडे याच्याविरोधात मंगळवारी (दि. २७) दुपारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गोरगरीब व गरजूंचे अन्नधान्य जादा किमतीला विकून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांनी दिली.
श्रीरामनगर परिसरात शासनाचे क्र. ४० फ, २११ हे शिधावाटप दुकान आहे. या दुकानाचे चालक सुरवाडे याने शासनाकडून आलेला गहू व तांदूळ वाटप न करता, परस्पर जादा किमतीने काळ्या बाजारात विकला. याबाबत शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांच्याकडे तक्रार आली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकून सुरवाडे याचे पितळ उघडे केले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सुरवाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शहरातील बहुतांश शिधावाटप दुकानदारांकडील वजनकाटा बनावट असून सर्व शिधावाटप दुकानांतील वजनमापांची तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.