लिफ्टमध्ये ८ जण तब्बल अडीच तास अडकतात तेव्हा..; माजी आमदाराच्या हॉटेलमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:10 AM2022-12-10T06:10:40+5:302022-12-10T06:11:13+5:30
अडीच तासांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास लिफ्ट तळमजल्यावर आणण्यात यश आले. त्यानंतर अडकलेल्या आठ जणांची सुटका करण्यात आली.
मीरा रोड : काशिमीरा येथील फाऊंटन नाका वरसावे येथील सीएन राॅक या हाॅटेलची लिफ्ट अतिवजनामुळे बंद पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. लिफ्टमध्ये अडकलेल्या आठ जणांनी अडीच तास काेंडमारा सहन केल्यानंतर त्यांची सुटका झाली. अग्निशमन दल एरव्ही लिफ्टचे काही भाग कापून अडकलेल्या व्यक्तींची सुटका करते. मात्र, यावेळी लिफ्ट उघडण्यासाठी अडीच तास वाट पाहण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचे हे हॉटेल आहे. येथे खासगी कार्यक्रमासाठी लाेक आले हाेते. या लिफ्टची क्षमता चार माणसांची आहे, मात्र त्यात आठ जण शिरल्यामुळे अतिवजनामुळे ही लिफ्ट तळ आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान दुपारी ३:३० च्या सुमारास बंद पडली.
समाजमाध्यमांवर संदेश व्हायरल
समाजमाध्यमांवर संदेश व्हायरल झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्यासह पोलिस पथक तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाचे डोसन ढोल्या व त्यांचे पथक हॉटेलमध्ये चारच्या सुमारास दाखल झाले. हॉटेल चालकांनी लिफ्टची देखभाल करणाऱ्या तज्ज्ञांनाही पाचारण केले हाेते. लिफ्टचा वरचा भाग व बाहेरचे दार कापून त्यांची तत्काळ सुटका करणे अपेक्षित होते.
मात्र, तत्काळ कार्यवाही होत नसल्याची बाब समजल्यावर पालिकेच्या देवदूत रेस्क्यू वाहनाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे जगदीश पाटील, संजय पाटील, राजू मुकादम, लक्ष्मण भंडारी आदींचे आणखी एक पथक घटनास्थळी पाठवले.
अडीच तासांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास लिफ्ट तळमजल्यावर आणण्यात यश आले. त्यानंतर अडकलेल्या आठ जणांची सुटका करण्यात आली. कार्यक्रमासाठी गर्दी हाेणार हे माहिती असतानाही खबरदारी म्हणून हॉटेलतर्फे लिफ्टमन ठेवणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.