कुख्यात डॉन दाऊदच्या भावाला छातीत कळ येते तेंव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:51 PM2018-05-29T22:51:44+5:302018-05-29T22:51:44+5:30
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरच्या छातीत कळ आणि आणि चक्कर आल्यामुळे कोणताही धोका न पत्करता ठाणे जिल्हा रुग्णालयाने त्याला मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविले.
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला सोमवारी रात्री मुंबईतील सर जमशेदजी जीजीभॉय (जे.जे.) रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पुन्हा ठाण्याच्या कारागृहात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका खंडणीच्या गुन्ह्यात कासकर सध्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. २७ मे रोजी त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार कारागृहातील अधिकाऱ्यांकडे केली होती. सुरुवातीला त्याला कारागृहातील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासल्यानंतर ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तिथेही प्रकृतीत सुधारणा नसल्याची त्याने तक्रार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने त्याला मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयात सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पाठवले होते. जे.जे.मध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्यावर हृदयाशी संबंधित सर्व तपासण्या करून तसे उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तामध्ये पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘रविवारी रात्री इकबालची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या सल्ल्यानुसार त्याला जे.जे. रुग्णालयात पाठवले होते. आता त्याची प्रकृती चांगली आहे.’’
नितीन वायचळ, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे
..........
‘‘ठाणे जिल्हा रुग्णालयातून आलेल्या ५६ वर्षीय इकबाल कासकरला छातीत दुखण्याच्या तसेच चक्कर येण्याच्या तक्रारीवरून २८ मे रोजी रात्री दाखल करण्यात आले होते. तपासणी आणि उपचाराअंती प्रकृती सुधारल्यानंतर त्याला २९ मे रोजी पहाटे डिस्चार्ज करण्यात आला आहे.
डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, सर जे.जे. रुग्णालय, मुंबई