कल्याण-मुरबाड केडीएमटीचा मुहूर्त कधी?

By admin | Published: January 11, 2017 07:11 AM2017-01-11T07:11:54+5:302017-01-11T07:11:54+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीने दोन वर्षांपूर्वी ठराव मंजूर करूनही कल्याण-मुरबाड मार्गावर बस चालू करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही.

When did Kalyan-Murbad KDMT be started? | कल्याण-मुरबाड केडीएमटीचा मुहूर्त कधी?

कल्याण-मुरबाड केडीएमटीचा मुहूर्त कधी?

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीने दोन वर्षांपूर्वी ठराव मंजूर करूनही कल्याण-मुरबाड मार्गावर बस चालू करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही.
पुरेशा वाहतुकीअभावी मुरबाड परिसरातील प्रवाशांची परवड सुरू आहे. प्रस्ताव मंजूर होऊन दोन वर्षे उलटले तरी ठरावीक प्राधिकरणाची मार्गावर बस चालविण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्यावर लवकरच परिवहन विभागाचे मंत्री व आयुक्तांची परवानगी घेऊन मार्गावर बससेवा सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी दिले आहे.
याआधी केडीएमटीची मुरबाड मार्गावर कल्याण-मामणोली ही बस सुरू होती. परंतु, अपुऱ्या बसमुळे ही सेवा बंद करावी लागली. मात्र, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियान योजनेंतर्गत परिवहन उपक्रमाला १८५ बस मंजूर झाल्या असून, फेब्रुवारीत १० वातानुकूलित बस आणि आॅगस्टमध्ये ६० बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. उर्वरित १०५ बस लवकरच ताफ्यात दाखल होतील.
सध्या कल्याण-मुरबाड रोडवरील एसटीची बससेवा अपुरी पडत आहे. परिणामी अन्य वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूटमार सुरू आहे. प्रवाशांची होणारी परवड आणि सेवा सुरू करण्याबाबतची वाढती मागणी पाहता परिवहनचे सदस्य दत्तकुमार खंडागळे यांनी कल्याण-मुरबाड आणि टिटवाळा-मुरबाड या मार्गावर केडीएमटीच्या बस चालवाव्यात, अशी मागणी केली होती. २०१४ मध्ये तत्कालीन सभापती रवींद्र कपोते यांच्या कार्यकाळात याप्रकरणी प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. परंतु, दोन वर्षे उलटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
मात्र, दुसरीकडे विद्यमान सभापती चौधरी यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे कल्याण-मुरबाड मार्गावर केडीएमटीची सेवा सुरू करण्याबाबत परवानगी मिळावी, असे पत्र ४ नोव्हेंबरला पाठविले होते. त्याला
सकारात्मक प्रतिसाद देत महानगर प्राधिकरणाने सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत परवानगीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या संदर्भात सभापतींना नुकत्याच पाठविलेल्या पत्रात ही सेवा सुरू करण्यासाठी कोणतीह आर्थिक मदत करू शकणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही प्राधिकरणाच्या परिवहन आणि दळणवळण विभागाने म्हंटले आहे. परंतू सेवा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन विभागाचीही (एमएमआरटीएला) मान्यता आवश्यक आहे. परंतु, या
विभागाकडे अद्यापपर्यंत पत्रव्यवहार केलेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: When did Kalyan-Murbad KDMT be started?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.