उल्हास नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:51 AM2019-05-06T00:51:06+5:302019-05-06T00:51:26+5:30

उल्हास नदी ही ३५ लाखांहून जास्त लोकसंख्येसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, तिच्याच अस्तित्वावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वर्षांपासून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.

When did the river Ulhas get rid of the waterfalls? | उल्हास नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका कधी?

उल्हास नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका कधी?

Next

- सदानंद नाईक, उल्हासनगर

उल्हास नदी ही ३५ लाखांहून जास्त लोकसंख्येसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, तिच्याच अस्तित्वावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वर्षांपासून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. जलपर्णीबरोबरच कारखान्यांतून सोडले जाणारे रासायनिक सांडपाण्यामुळेही अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील जलचरांच्याही अस्तित्वावर घाला येत आहे. जलपर्णीत सापडलेले मृत मासे हे या समस्येचे गांभीर्य जाणण्यासाठी पुरेसे ठरावे. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत तज्ज्ञांकडून सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर व ग्रामीण परिसरातील गावाचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. तसेच, पावसाळ्यानंतर नदीची पाणीपातळी कमी होते. त्यामुळे आंध्र व बारवी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. हे पाणी विविध ठिकाणी बंधारा बांधून अडवले जाते. त्यानंतर ते पाणी पंपिंग मशिनद्वारे साठवण टाकत आणले जाते. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेनंतर हे पाणी नागरिकांना पुरवले जाते.

नदीची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही नदी किनाºयावरील शहरांच्या नगरपालिका, महापालिका यांच्यासह पाटबंधारे विभाग, एमआयडीसी आदींची आहे. याकडे या यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्यानेच नदी प्रदूषित होत आहे. याविरोधात ‘वनशक्ती’ या सामाजिक संस्थेने हरित लवाद आणि न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. हरित लवादाने नदी किनाºयावरील उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महापालिकेसह अंबरनाथ नगर परिषद व एमआयडीसीला यासाठी १०० कोटींचा दंड ठोठावला होता.

उल्हासनगरातील सांडपाण्याचा खेमानी नाला उल्हास नदीला मिळतो, त्याच पात्रातून एमआयडीसी पंपिंग मशिनद्वारे पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहरांना पाणीपुरवठा करते. नदी प्रदूषण होऊ नये, म्हणून नाल्याचा प्रवाह वळवण्याचा सल्ला हरित लवादासह न्यायालयाने महापालिकेला दिला होता. मात्र, निधी नसल्याचे कारण देत महापालिकेने पळवाट काढली. मध्यंतरी अमृत योजनेंतर्गत ३२ कोटींचा निधी नाल्याचा प्रवाह वळवण्यासाठी आणि नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आला. खेमानी नाला अडवून सांडपाणी मोठ्या विहिरीत आणून विहिरीतील सांडपाणी पंपिंग मशिनद्वारे मलनि:सारण केंद्रात नेण्यात येणार आहे. केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ न वालधुनी नदीत सोडण्यात येणार आहे.
मलनि:सारण केंद्राचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण व्हायला हवे. मात्र, अद्याप केंद्राचे ६० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. याबाबत गेल्याच महिन्यात न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच, शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत २७९ कोटीच्या योजनेला मान्यता देऊ न योजनेच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यात मुख्य मलनि:सारण वाहिन्या टाकून वडोलगाव, शांतीनगर आणि खडेगोलविली येथे मलनि:सारण केंद्राचे काम सुरू आहे.

उल्हास नदीत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच ग्रामीण परिसरातील सांडपाणी थेट सोडले जात असल्याचे उघड झाले. देशातील प्रदूषित नद्यांमध्ये उल्हास नदीचा समावेश आहे. नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णीही फोफावली आहे. जलपर्णी पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेत असल्याने जलचरांना धोका झाला आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे जलपर्णीमुक्त नदीचा मंत्र एका सामाजिक संस्थेने दिला आहे. तसेच, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाने जलपर्णी काढण्यासाठी उपोषणही केले होते. मात्र, या सर्वांचा संबंधित पालिकांसह राज्य शासन, पाटबंधारे विभागासह एमआयडीसीवर काहीच परिणाम झालेला नाही.

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाºया उल्हासनदीला जलपर्णीचे ग्रहण लागले आहे. या नदीच्या पात्रातील जलपर्णीच्या प्रदूषणामुळे नुकतेच हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे नदीचे पाणी पिणाºया नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला. मात्र, या समस्येविरोधात अनेक आंदोलने होऊ नही पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमआयडीसीकडून उपाययोजना करण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेच दिसत आहे. या यंत्रणांमधील समन्वयाचा अभावही याला सर्वस्वी कारणीभूत ठरत आहे.

सामाजिक संघटनेचा उत्स्फूर्त सहभाग
नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी बदलापूरमधील तरुण-तरुणींना सोबत घेऊ न एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊ न त्या परिसरातील नदी पात्रातील जलपर्णीसह कचरा, प्लास्टिक बाहेर काढले. तसेच म्हारळ, वरप, कांबा आदी गावांतील तरुणांनीही स्वयंस्फूर्तीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. तर सेंच्युरी कंपनीजवळील एमआयडीसी पंपिंग स्टेशन परिसरात सामाजिक संस्थेने महाराष्टÑ दिनी जलपर्णी काढण्याची मोहीम राबविली.

पाटबंधारे विभाग, महापालिकेला जाग
सामाजिक संस्था व तरुणांनी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली व पाटबंधारे विभागाला जाग आली असून त्यांनी जेसीबीद्वारे जलपर्णी काढण्याचे काम महाराष्टÑ दिनापासून सुरू केले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जलपर्णी काढण्याचे काम पाटबंधारे विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिकेसह उल्हासनगर महापालिका व अंबरनाथ-बदलापुर नगरपरिषदेने संयुक्तपणे सुरू केले असते तर उल्हास नदीची एवढी दुरवस्था झालीच नसती आणि लाखो नागरिकांना होणारा दूषित पाण्याचा पुरवठा टळला असता. यापुढे तरी या यंत्रणांनी उल्हास नदीला जलपर्णीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

Web Title: When did the river Ulhas get rid of the waterfalls?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.