ठाकुर्ली भाजी मंडईला मुहूर्त कधी? वापराविना धूळखात : ‘मंगलकलश’शेजारील वास्तूत फेरीवाल्यांना जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:43 AM2017-11-15T01:43:02+5:302017-11-15T01:43:05+5:30
ठाकुर्ली पूर्वेतील मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी बांधलेली तीन हजार चौरस फुटांची वास्तू वापराविना धूळखात पडून आहे.
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी बांधलेली तीन हजार चौरस फुटांची वास्तू वापराविना धूळखात पडून आहे. ठाकुर्ली शहराचा वाढता विस्तार पाहता ही मंडई सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रेल्वेस्थानक परिसर व मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांना येथे स्थलांतरित केल्यास हा परिसर फेरीवालामुक्त होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी आरक्षण ठेवले होते. त्यामुळे विकासकाने सोसायटी विकसित करताना भाजी मंडई बांधून दिली. तळ अधिक एक मजली अशी तीन हजार चौरस फुटांची वास्तू अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे, अशी माहिती रहिवासी राजू शेख यांनी दिली. ठाकुर्लीचा विस्तार झपाट्याने होत आहे. असे असतानाही रहिवाशांना भाजीखरेदीसाठी ठाकुर्लीतील बँक परिसर, रेल्वेस्थानक परिसरातील मुख्य बाजारपेठ अथवा डोंबिवलीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ठाकुर्लीतील मंडई सुरू करण्याची मागणी होत आहे. एकाच वास्तूच्या मंडईत भाजीविक्री सुरू झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. नागरिकांचा डोंबिवलीपर्यंत जाण्याचा वेळ आणि त्रासही वाचेल. तसेच ठाकुर्ली फेरीवालामुक्त होण्यास मदत होईल. ठाकुर्लीतील समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरातही मंडई बांधण्याचीही मागणी जोर धरत आहे.
ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसरात मंडई उभारण्यासाठी भाजपाचे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने पत्रव्यवहार केला होता. विद्यमान नगरसेवक साई शेलार हे देखील प्रयत्न करत आहेत. पण, नेमकी अडचण कुठे आहे, हे समजत नसल्याने समस्या जास्त गंभीर होत आहे.
उपद्रवींचा त्रास -
मंडईची वास्तू पडून असल्याने तेथे रहिवाशांचे लक्ष नसते. त्याचा फायदा उपद्रवी व्यक्तींकडून घेतला जात आहे. रात्रीच्या वेळी तेथील अंधाराचा फायदा मद्यपी घेतात. अनेकांनी त्या वास्तूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. काहींनी वास्तूमध्ये उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोसायटीची सुरक्षा धोक्यात आली होती. आता सोसायटीत पूर्णवेळ सुरक्षारक्षक आहेत, पण तरीही त्यांची नजर चुकवून काही उपद्रवी तेथे जातातच. त्यांना कसे थांबवणार. रात्रीच्या वेळी अंधारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मंडई सुरू करण्यामागील नेमकी अडचण काय आहे, हे तरी महापालिकेने स्पष्ट करावे. भाजी मंडईसाठी इमारत उभारल्याने त्याचा त्यासाठीच वापर व्हावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.