समांतर रस्ता सुस्थितीत येणार कधी?; पावसाळ्यात अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:12 AM2019-06-06T00:12:46+5:302019-06-06T00:12:54+5:30
कल्याणहून डोंबिवलीला तसेच डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी नजीकचा पर्याय म्हणून रेल्वे समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
डोंबिवली : पावसाळा कधीही सुरू होईल, अशी परिस्थिती असताना चार महिन्यांपूर्वी ड्रेनेजलाइन टाकण्याकामी खोदलेल्या कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. सध्या सुस्थितीत नसलेल्या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकिरीचे बनले असताना पावसाळ्यात खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याणहून डोंबिवलीला तसेच डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी नजीकचा पर्याय म्हणून रेल्वे समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कल्याण-शीळ मार्गावरची वाहतूककोंडी तसेच इंधनाचा होत असलेला अपव्यय पाहता केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. आजघडीला या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुस्थितीतील समांतर रस्त्याला वाहनचालकांची पसंती मिळत असताना दुसरीकडे या रस्त्यावरील ठाकुर्ली रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर जानेवारीमध्ये अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. तेथील गृहसंकुलांना ड्रेनेजव्यवस्थेशी जोडण्याचे काम केडीएमसीच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ड्रेनेजसाठी खोदकाम करायचे होते, तर ते आधी करणे आवश्यक होते.
सुस्थितीत, चांगला रस्ता त्या कामासाठी खोदण्यात आला. चार महिने हे काम सुरू होते, पण काही गृहसंकुलांपुरतेच ते मर्यादित राहिले. जो रस्ता म्हसोबा चौकातून खंबाळपाडा येथे जातो, त्या रस्त्यावरही एका बाजूकडील मार्गावर ड्रेनेजलाइन टाकण्यात आली. हे काम सुरू होते, तेव्हा कोणतीही सूचना अथवा कामाच्या माहितीचा फलक लावला नव्हता. त्यामुळे नेमका कोणत्या कामासाठी रस्ता खोदला गेला आहे, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम होता.
खड्ड्यांच्या ठिकाणी केवळ मातीचा भराव
काम आता पूर्ण झाले असले, तरी त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी मातीचा भराव टाकून त्यावर खडी टाकण्यात आली आहे. डांबर न टाकल्याने अर्ध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर टाकलेली खडी बाहेर पडून इतरत्र विखुरली आहे. पावसाळ्याआधी हा रस्ता सुस्थितीत येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, पावसाळा तोंडावर आला तरी केडीएमसीला येथे डांबरीकरणासाठी मुहूर्त मिळालेला नाही. पावसाळ्यात खड्डेमय आणि चिखलमय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.